हुंडा दिला नाही म्हणून जळगावात नवरदेवाने लग्न मोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:42 IST2018-02-28T22:42:43+5:302018-02-28T22:42:43+5:30
वसंतवाडीच्या वधूने केली पोलिसात फसवणुकीची तक्रार

हुंडा दिला नाही म्हणून जळगावात नवरदेवाने लग्न मोडले
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २८ : साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख निश्चित होऊन त्यासाठी मंडप, वाजंत्री, घोडा, लग्नपत्रिका आदी तयारी झालेली असतानाच ऐनवेळी नवरदेवाकडून ५० हजार रुपये हुंडा व १० ग्रॅम सोन्याच्या साखळीची मागणी करण्यात आली. ती पूर्तता करण्यास वधू पक्षाने नकार देताच नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसंतवाडी, ता.जळगाव येथील वधूच्या वडीलांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसंतवाडी येथील मुलीचा विवाह पळासखेडा (मोगलाई) ता. सोयगाव येथील तरुणासोबत निश्चित झाला. १५ फेब्रुवारी रोजी वसंतवाडी येथे दोघांचा साखरपुडा झाला. त्यादिवशी २३ एप्रिल २०१८ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. त्यानुसार मंडप, घोडा, वाजंत्री बुक करुन लग्नपत्रिका छापल्या. गावोगावी पत्रिका वाटपाचे काम सुरु असतानाच नवरदेवाच्या वडीलांनी नवरीकडील मंडळीला २६ फेब्रुवारी रोजी पळासखेडा येथे बोलावून घेतले. त्यानुसार नवरीचे आई, वडील व मेहुणे तेथे गेले होते.
नवरदेवाच्या घरी बैठक बसल्यानंतर नवरदेवाने ५० हजार रुपये रोख व १० ग्रॅमची सोन्याची अंगठी आदीची मागणी केली. आपल्या समाजात हुंड्याची पध्दत नाही असे माहिती असतानाही त्यांनी तुम्ही जर पुर्तता करु शकत नसाल तर आम्ही आताच लग्न मोडत असल्याचे जाहिर करुन शिवीगाळ करीत घरातून हाकलून लावले. लग्न मोडल्याने वधू पक्षावर मोठ संकट कोसळले.