अध्यक्षांविना ग्राहक मंचमध्ये १७४६ तक्रारींवर साचली धूळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:04 IST2023-04-20T16:03:38+5:302023-04-20T16:04:09+5:30
परिमाणी गेल्या दीड महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’चा प्रवास सुरु असताना १७४६ तक्रारींवरची सुनावण्या रखडल्या आहेत.

अध्यक्षांविना ग्राहक मंचमध्ये १७४६ तक्रारींवर साचली धूळ!
- कुंदन पाटील
जळगाव : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षासह सदस्यपद दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने अनेक तक्रारदार न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे, अध्यक्ष, दोन सदस्यांसह आयोगाच्या कार्यालयातील महत्त्वपूर्ण पदे रिक्तच असल्याने दैनंदिन कामकाजाचीही कोंडी होत आहे. परिमाणी गेल्या दीड महिन्यांपासून ‘तारीख पे तारीख’चा प्रवास सुरु असताना १७४६ तक्रारींवरची सुनावण्या रखडल्या आहेत.
यापूर्वी राज्य शासन पात्रता आणि परीक्षा पद्धतीनुसार अध्यक्षांसह सदस्यपदांवर नियुक्त्या करत होते. मात्र राज्य शासनाच्या परीक्षा पद्धतीविरोधात सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावर सर्वोच्य न्यायालयाने ३ मार्च २३ रोजी ५३ पानांचे निकालपत्र दिले. नियुक्त्या करण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाने एक संहिता निश्चीत केली आहे.
तत्पूर्वी जळगाव ग्राहक मंचच्या अध्यक्षा पूनम मलिक २८ फेब्रुवारीपासून निवृत्त झाल्या. तर अन्य दोन्ही सदस्यांच्या जागाही रिक्तच होत्या. त्यामुळे जळगावच्या मंचाच सुरेश जाधव यांच्या माध्यमातून एकमेव सदस्य पीठावर कार्यरत आहेत. अनेक पदे रिक्त या कार्यालयात कारकून, लेखाधिकारी व प्रबंधकाचे प्रत्येक एक पद रिक्त आहे. तर या मंचावर सेवेत असलेले सदस्य सुरेश जाधव हे १७ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नुसता कागदावरच राहणार आहे.
ग्राहकांचा संताप
आयोगाकडे १ मार्च ते २० एप्रिलदरम्यानच्या कालावधीत १७४६ तक्रारी पडून आहेत. अध्यक्षच नसल्याने या तक्रारींच्या सुनावणींवर ‘तारीख पे तारीख’चा पुकारा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.