वर्षभरात १,३५१ गुन्ह्यांची नोंद, तर ५५३ संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 21:21 IST2021-01-15T21:20:35+5:302021-01-15T21:21:31+5:30
राज्य उत्पादन शुल्काची कारवाई : दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

वर्षभरात १,३५१ गुन्ह्यांची नोंद, तर ५५३ संशयितांना अटक
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने मागील वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर, २०२० या कालावधीत अवैध मद्यविक्री विरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत १ कोटी ९८ लाख २९ हजार ३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे या वर्षभरात एकूण १,३५१ गुन्हे नोंदविलेले असून, यामध्ये वारस-५३९, बेवारस-८१२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ५५३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोहाफुले १०० किलो, हातभट्टी दारू १८,१७३ लीटर, देशी मद्य ११०३.०९ ब.ली., विदेशी मद्य १८०७.०३ ब.ली., बीअर १०९.२९ ब.ली. तसेच बनावट देशी मद्य ४२३.३६ ब.ली. बनावट विदेशी मद्य २५.९ ब.ली., परराज्यातील मद्य ९.७५ ब.ली., बनावट ताडी ५६१ लीटरचा समावेश आहे. यात ५५ दुचाकी व ६ चारचाकी वाहनांचाही समावेश असून, वर्षेभरात १ कोटी ९८ लाख २९ हजार ३१ रपये इतक्या रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्रा.पं. निवडणूक काळात ३४ गुन्ह्यांची नोंद
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही विभागाने १ ते १३ जानेवारी, २०२१ या १३ दिवसांमध्ये एकूण ३४ गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये वारस १४, बेवारस २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण १९ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर देशी, विदेशी दारू, तसेच ३ दुचाकी वाहने, एक (टाटा सुमो) चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ७४ हजार ६२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनावट दारूचे कारखाने उद्ध्वस्त
निवडणूक काळात तीन बनावट दारूचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्याकरिता लागणारे साहित्य स्पिरिट, ३ बॉटलिंग मशिन, हायड्रोमीटर, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या, तसेच मद्यार्क ३५० ब. ली., बनावट देशी, विदेशी मद्य ८५० ब.ली., एक दुचाकी वाहन व तीन चारचाकी वाहने असा एकूण २० लाख ६१ हजार ९९१ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
विशेष भरारी पथकाची नियुक्ती जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाकडून अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी जिल्ह्यात एक विशेष भरारी पथक व इतर पाच पथके नियुक्त करण्यात आले आहे.