घरफोडीत रक्कम न मिळाल्याने कार लंपास, जळगावातील धक्कादायक प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:22 IST2018-02-27T13:22:24+5:302018-02-27T13:22:24+5:30
गणेश कॉलनीतील घटना

घरफोडीत रक्कम न मिळाल्याने कार लंपास, जळगावातील धक्कादायक प्रकार
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - घरफोडीसाठी आलेल्या चोरट्यांनी गितेश मधुकर मेश्राम यांच्या घरात रोख रक्कम व दागिने हाती न लागल्याने कपाटात ठेवलेली कारची चावी घेऊन पाच लाख रुपये किमतीची कार लांबविल्याची घटना रविवारी सायंकाळी उघड झाली.
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा एकदा सुरु झालेले आहे.
गितेश मेश्राम हे २१ फेब्रुवारीला घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कंपाऊडच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाट फोडले. त्यातील सामान बाहेर फेकला, मात्र चोरट्यांना घरात काहीही मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेली कारची चावी काढून ही कार लांबविली.
मेश्राम हे रविवारी सकाळी आठ वाजता घरी परतल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.