जड वाहनांमुळे साकेगावातील शेत रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:18 IST2021-09-11T04:18:25+5:302021-09-11T04:18:25+5:30

भुसावळ : शहराजवळील साकेगाव ते वांजोळा रस्त्यावर बहुतांशी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मात्र या रस्त्यावर २४ तास जड वाहनांची ...

Due to heavy vehicles, farm roads in Sakegaon were blocked | जड वाहनांमुळे साकेगावातील शेत रस्त्यांची लागली वाट

जड वाहनांमुळे साकेगावातील शेत रस्त्यांची लागली वाट

भुसावळ : शहराजवळील साकेगाव ते वांजोळा रस्त्यावर बहुतांशी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मात्र या रस्त्यावर २४ तास जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे रस्ता जणू खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावरून जावे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रोजच्या जड वाहनांच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडी आडवी करत जड वाहनांचा रस्ता अडविल्याने दुतर्फा जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

महामार्गाच्या बोगद्याच्या खालून साकेगाव ते वांजोळा या रस्त्यावर दत्तमंदिराच्या पलीकडे ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. येथून जड वाहनांची वर्दळ २४ तास सुरू असते. मात्र त्याचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागतो. जड वाहनांमुळे रस्ता खूपच खराब झाला आहे. बैलगाडी जाण्यायोग्यही रस्ता राहिला नाही. पायी गेले तर डबक्यांमध्ये पाणी तुंबल्यामुळे कसरत करावी लागते. कसेतरी बाजूच्या शेतशिवारातून पाऊलवाट धरून मार्गक्रमण करावे लागते. अनेक वेळा यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो.

आणि शेतकऱ्यांनी रोखला रस्ता

या रस्त्यावर ज्यांची जड वाहने चालतात, त्यांना वेळोवेळी सांगूनही दुर्लक्ष केले जात होते. अखेर संतप्त शेतकरी विनोद पवार, संजय सोनवणे, चेतन पवार, चंद्रकांत सपकाळे, युवराज फालक, विनोद पाटील, सुधाकर नेरकर, गोकुळ महाजन, संतोष महाजन, गणपत पाटील, भास्कर पाटील, रंजनसिंग यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यामध्ये बैलगाडी आडवी करत हा रस्ता जड वाहनांसाठी वापरू नये असे सांगत रोखून धरला होता. तब्बल दोन ते तीन तासांपर्यंत रस्ता बंद असल्याने दुतर्फा २० ते ४० वाहनांची रांग लागली होती.

मुरूम टाकल्यानंतर रस्ता झाला खुला

ज्या जड वाहनांचा इथून वापर होतो, त्यापैकी काही व्यवसायिकांनी या ठिकाणी मुरूम व कच टाकल्यानंतर व इतर व्यवसायिकांनी आम्हीसुद्धा या ठिकाणी मुरूम-कच टाकून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता जड वाहनांच्या वापरासाठी खुला केला.

Web Title: Due to heavy vehicles, farm roads in Sakegaon were blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.