अतिपावसामुळे मराठवाडा, विदर्भात जाणारी डाळ निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:07+5:302021-08-01T04:16:07+5:30
विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठवाडा, विदर्भात झालेल्या दमदार पावसामुळे दळणवळणावर त्याचा मोठा परिणाम होऊन जळगावातून त्या ...

अतिपावसामुळे मराठवाडा, विदर्भात जाणारी डाळ निम्म्यावर
विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठवाडा, विदर्भात झालेल्या दमदार पावसामुळे दळणवळणावर त्याचा मोठा परिणाम होऊन जळगावातून त्या भागात जाणारी डाळ निम्म्याने घटली आहे. त्यामुळे साठा मर्यादेपाठोपाठ आता डाळ उद्योगासमोर पुन्हा एकदा हे नवीन संकट उभे राहिले आहे.
जळगावातील डाळ उद्योग मोठा असून येथून देशाच्या विविध भागांसह विदेशातही मोठ्या प्रमाणात डाळ निर्यात होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून डाळ उद्योगासमोर एकामागून एक संकट येत आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला त्या वेळी भारतासह इतर देशात त्याचा शिरकाव होण्यापूर्वी अनेक देशांनी डाळींची अधिक मागणी केली व त्यामुळे डाळीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली होती. मात्र त्यानंतर संसर्ग भारतासह सर्वत्र पोहोचला व त्याचा डाळ निर्यातीवर परिणाम झाला. त्यानंतर यातून हा उद्योग सावरला. त्यानंतर यंदा २ जुलै रोजी केंद्र सरकारने कडधान्याच्या साठवणुकीवर मर्यादा आणल्याने डाळींचे भाव गडगडले व त्याचा फटका डाळ उद्योगांना सहन करावा लागला.
एकाच महिन्यात दुसरे संकट
कडधान्य साठवणुकीवर मर्यादा व त्यानंतर जुलै महिन्यातच पुन्हा ठिकठिकाणी अतिवृष्टी होऊन त्याचा फटका डाळ उद्योगाला बसला. विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे रस्ते, पूल खचण्यासह अनेक व्यवसायांवरही त्याचा परिणाम झाला. या पावसामुळे नांदेड, जालना, बुलडाणा, खामगाव या भागात जाणारी डाळ निम्म्याने घटली आहे. रस्त्यांअभावी मोजकी वाहने कशीबशी जात असून त्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने त्यामुळे एरवी विदर्भात व मराठवाड्यात दररोज जाणारी २०० टन डाळ निम्म्यावर येऊन ती १०० टनांपर्यंतच जात आहे. जळगावात ७० ते ७५ दालमिल असून येथील उत्पादनावर त्याचा परिणाम होत असल्याचे दालमिल चालकांनी सांगितले.
विदर्भ व मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन त्या भागात जाणारी डाळ निम्म्याने घटली आहे. साठा मर्यादेतून सावरत नाही तोच आता हे नवीन संकट आल्याने चिंता वाढली आहे.
- रमेश जाजू, सचिव, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन