जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, शहरवासीय भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:04 IST2018-02-24T23:04:11+5:302018-02-24T23:04:11+5:30
तीन जणांना चावा

जळगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, शहरवासीय भयभीत
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. २४- शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे शहरातील विविध भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले.
शहरातील मुक्ताईनगर परिसरातील आदित्य जानकीराम सपकाळे (११) हा मुलगा रस्त्याने जात असताना अचानक कुत्र्याने त्याला चावा घेतले. अशाच प्रकारे शिरसोली येथील रहिवासी शेख अमीन शेख नबी हे दुचाकीने जात असताना कुत्र्याने पाठलाग करून त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतला. हर्षवर्धन मोरे (२८, रा. सुप्रीम कॉलनी) यांनाही कुत्र्याने चावा घेतला. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
नागरिक भयभीत
शहरातील हरिविठ्ठलनगर, रामानंद नगर, मुक्ताईनगर, शिवाजीनगर ते थेट दूध फेडरेशन रस्ता, एसएमआयटी महाविद्यालय परिसर या भागांमध्ये कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पादचाºयांसह दुचाकीस्वारांचा पाठलाग करून चावा घेत असल्याच्या घटना वाढत आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असून मनपाने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.