जळगाव : तालुक्यातील कुसुंबा शिवारात लाख्या नाल्यात सोमवारी दुपारी बारा वाजता औषधांचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील काही औषधांची मुदत संपलेली आहे, तर ९० टक्के औषधी मुदतीत आहे. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुसुंबा शिवारातील लाख्या नाल्यात कोणी तरी अज्ञात व्यक्तीने मुदत संपलेली औषधी फेकल्याची माहिती गावातील निलेश ठाकरे या तरुणाच्या निदर्शनास आले. त्याने पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांना ही माहिती कळविली. चौधरी यांनी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ माहिती दिली.त्यानुसार शिरसाठ यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, सचिन पाटील, योगेश बारी व इम्रान सय्यद यांना घटनास्थळावर रवाना केले. तेथे नाल्यात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांची औषधी व त्याचे खोके आढळून आले. या नाल्याच्या पाण्याचा पिकांना तसेच मुके जनावरांसाठी वापर होतो.या औषधांमुळे पाणी प्रदुषित होऊन धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी घटनास्थळावर पंचनामा करुन ही औषधी पोलीस ठाण्यात आणली. दरम्यान, ही औषधी मुंब्रा, जि.ठाणे येथे उत्पादीत झालेली आहे. ही औषधी कोणी फेकली, कोणाची आहे याची चौकशी आता पोलीस करीत आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.
नाल्यात आढळला औषधांचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST