लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे जळगाव शासकीय महाविद्यालयातच उपअधिष्ठाता म्हणून तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यात वैद्यकीय शिक्षण संचालकांकडून १३ सप्टेंबरलाच याबाबत आदेश काढण्यात आले होते. शैक्षणिक कामकाज सांभाळण्यासाठी ही तात्पुरती जबाबदारी असल्याचे आदेशात म्हटल्याचे समजते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त पदभार असलेले डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी पदभार स्वीकारला मात्र, डॉ. रामांनद यांनी तो सोपविला नव्हता. १३ सप्टेंबरपासून डॉ. फुलपाटील यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी नियमित आढावा घेणे, व्हिसीत सहभाग नोंदविणे, कार्यक्रमांना सहभाग देणे, राऊंड घेणे आदी कामांना सुरुवात केली आहे. यात गुरुवारी त्यांचे परिचारिकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. दरम्यान, दुसरीकडे डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नेमकी नियुक्ती कुठे याबाबत संभ्रमावस्था असतानाच जळगावातच उपअधिष्ठाता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, याबाबतचे असे कसलेच आदेश अद्याप आपल्याला प्राप्त नसल्याचे डॉ. रामानंद यांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांचे वेट ॲण्ड वॉच
डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अगदी क्वचित मंडळींनी पुढाकार घेतला. मात्र, अनेक डॉक्टर्स अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. डॉ. फुलपाटील यांना भेटणे टाळत असल्याचेही चित्र आहे. डॉ. मिलिंद फुलपाटील यांना भेटून चर्चा केल्यानंतर उद्या पुन्हा डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे पदभार आल्यानंतर नंतर करायचे काय, असा प्रश्न असल्याने अद्याप अनेक डॉक्टर्सनी नवे डीन डॉ. फुलपाटील यांची भेट टाळल्याचे परिसरात बोलले जात आहे.