चाळीसगावातून भाजपकडून डझनभर इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 13:10 IST2019-09-01T13:07:44+5:302019-09-01T13:10:34+5:30
जळगावला घेणार श्रेष्ठींची भेट

चाळीसगावातून भाजपकडून डझनभर इच्छुक
चाळीसगाव, जि. जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसगावातून भाजपच्या उमेदवारीसाठी डझनभर इच्छुक जळगाव येथे रविवारी दुपारी पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा बिगूल केव्हाही वाजू शकतो अशी चिन्हे असल्याने चाळीसगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून इच्छुकांचे मोठे शक्तिपदर्शन सुरु आहे. विशेष म्हणजे यासाठी विविध कार्यक्रमांसोबत उपक्रमांचा राबताही सुरु आहे.
शनिवारी या इच्छुकांची ‘बायोडाटा’ अपडेट करण्यासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र होते. मध्यंतरी चाळीसगावातील भाजपाच्या जुन्या पदाधिका-यांनी पत्रपरिषदेत ‘जुन्या कार्यकर्त्यांना’ उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणीही केली आहे.
भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील हे चाळीसगावसह पाचोरा - भडगाव मतदार संघातून इच्छुक आहेत. चाळीसगावमधून भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, माजी जि.प.सदस्य धर्मा वाघ, नगरसेवक राजेंद्र चौधरी, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती संजय भास्कर पाटील, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे सचीव डॉ. विनोद कोतकर, सतीष दराडे, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.सुनील राजपूत, युवा उद्योजक किशोर पाटील ढोमणेकर आदी इच्छुक म्हणून गाठीभेटी घेणार आहेत. अन्य काही इच्छुकांनी आपले मनसुबे स्पष्ट केले नसले तरी थेट गाठीभेटीसाठी ते उपस्थित राहू शकतात.