घाबरू नका,पण जागरूक रहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:59 PM2020-03-16T12:59:16+5:302020-03-16T12:59:41+5:30

वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन : जिल्हाभरात घेतली जात आहे दक्षता

 Don't panic, but be aware! | घाबरू नका,पण जागरूक रहा !

घाबरू नका,पण जागरूक रहा !

Next

जळगाव : कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक रहावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे़ विविध पातळ्यांवर थोडी काळजी घेतल्यास कोरोनाचा संसर्ग आपण टाळू शकतो, असेही या तज्ज्ञांनी सांगितले आहे़ त्यामुळे ‘घाबरू नका, पण जागरूक रहा’ ही जागृती मोहीम राबविली जात आहे़

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वीमिंग पूल, नाट्य गृह, सिनेमा गृह, व्यायाम शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा उपायुक्त अजित मुठे यांनी दिले आहेत. शहरातील सर्व मनपा शाळा, खाजगी शाळा, स्विमींग पूल, नाट्यगृह, सिनेमागृह, व्यायाम शाळा, म्युझीअम ३१ मार्र्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश उपायुक्त मुठे यांनी रविवारी दिले. तसेच शहरातील हॉटेल व्यवसायीकांनी आपल्याकडे बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची माहिती मनपाच्या वैद्यकीय विभागाला द्यावी व प्रवाशांपैकी कोणाला सर्दी खोकला येत असेल तर, तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलाणी यांनी केले आहे.

ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी स्वत: गर्दीत न जाता काळजी घ्यावी, विदेशातून आलेल्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनीही गर्दीत जाऊ नये. नाका, तोंडावर रूमाल बांधावा. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवूनच सेवन करावे़ सध्या आपल्याकडे एकही रूग्ण नाही, शिवाय जे विदेशातून आले आहे त्यांनाही लक्षणे नाहीत़ मात्र, शासकीय पातळीवर सर्व दक्षता घेतली जात आहे़
- डॉ़ दिलीप पोटोडे,
जिल्हा आरोग्य अधिकारी

खोकल्यावर अथवा शिंकल्यावर, एखाद्या आजारी व्यक्तिच्या संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ धुवा, सर्वाजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे टाळा, पूर्णपणे शिजवलेलेच अन्न खा़ शिंकताना, खोकताना नाकावर रूमाल बांधा, ताप, कोरडा खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लोकांशी नजीकचा संपर्क टाळा
- राम रावलानी,
प्रमुख वैद्यकीय अधिकारी मनपा

कोरोनाचा संसर्ग हा बोलण्यातून, शिंकण्यातून, खोकल्यातून होतो़ त्यामुळे नाका, तोंडासमोर रूमाल बांधावा, हात नाका तोंडाला लागल्यास संसर्ग होऊ शकतो तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा हात स्वच्छ साबणाने धुवावेत़ ज्येष्ठ नागरिकांना लागण होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांनी शक्यतोवर गर्दीत जाणे टाळावे व दक्षता घ्यावी़ तसे आपल्याकडे तापमान वाढत असल्याने धोका नाही, मात्र, ही काळजी घेणे आवश्यक आहे़
- डॉ़ दीपक पाटील,
आयएमए जळगावचे नवनिर्वाचित अध्यक्ष

सॅनेटायझर, मास्कचा जाणवतोय तुटवडा
-कोरोनाच्या भीतीने सॅनेटायझर, मास्कला मोठी मागणी वाढली असून शहरात त्याचा तुटवडा जाणवत आहे. विशेष म्हणजे कंपन्यांनी या दोन्ही वस्तूंची किंमत वाढविली असून ग्राहक जास्त पैसे देत असले तरी त्या मिळत नसल्याचे चित्र आहे.
-कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालय, कार्यालय या ठिकाणी विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी सॅनेटायझरचा वापर करू लागले आहे. अचानक मागणी वाढल्याने व त्या प्रमाणात पुरवठा नसल्याने त्यांचा तुटवडा जाणवत आहे.
-अनेक औषधी दुकानांवर फिरुनदेखील सॅनेटायझर मिळत नसल्याने ग्राहकांची कुचंबना होत आहे. अशाच प्रकारे मास्कचादेखील तुटवडा जाणवत असून या दोन्हींचे भाव कंपन्यांनी एकदम वाढविले आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
-कोरोना व्हायरसच्या विषाणूच्या बचावासाठी सॅनेटायझरच आवश्यक आहे, असे नाही तर त्या ऐवजी स्पिरीट व पाणी एकत्र करून त्याचा वापर केला अथवा साबणाने हात धुतले तरी चालते. तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मास्कचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केले आहे.

आयएमएतर्फे बुधवारी मार्गदर्शन
इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावची बुधवारी रात्री ८: ३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे़ कोरोना बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेकडून आलेल्या मार्गदर्शन सूचना व नेमकी उपचार पद्धती यावर मागर्दशन व चर्चा केली जाणार आहे़ यात काही खासगी डॉक्टर, काही वैद्यकीय अधिकारी असे उपस्थित राहणार आहेत. कोरोनाबाबतचे समज- गैरसमज जाणून घेण्यात येणार असून त्यावरही मार्गदर्शन होणार आहे़ आयएमएच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी दिली़
 

Web Title:  Don't panic, but be aware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.