कोणताही निधी निष्क्रियपणामुळे परत जाऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:05+5:302021-03-25T04:16:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत ...

Don’t let any funds go back to inactivity | कोणताही निधी निष्क्रियपणामुळे परत जाऊ देऊ नका

कोणताही निधी निष्क्रियपणामुळे परत जाऊ देऊ नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेला राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा वेळेवर खर्च होत नसल्याने तो निधी अनेकदा परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येते. अनेक वेळा या निधीतून नियोजन केल्यानंतरही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा निधी खर्च होऊ शकत नाही. त्यामुळे या पुढील काळात कोणत्याही अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे कोणताही निधी परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर येऊ नये, अशा कडक शब्दांत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी महापालिकेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात घेतली. या बैठकीला सर्व विभागप्रमुख व महापालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेची माहिती घेतली. यासह वॉटर ग्रेसकडून शहरात सुरू असलेल्या साफसफाईच्या कामांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

आतापर्यंत जे चालले ते झालं, आता प्रत्यक्ष कामांवर भर द्या

गेल्या अडीच वर्षांत कशा प्रकारे कामकाज झाले त्यावर आता कोणतीही चर्चा न करता नव्याने कामकाज करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. अधिकाऱ्यांच्या ज्या अडचणी असतील, त्या अडचणी मनात कोणताही संकोच न बाळगता आमच्याकडे सांगा. त्या अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र शहरातील नागरिकांचा आलेल्या अडचणींकडे अधिकारी व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. यासह महापालिकेचा आकृतिबंध मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती महापौरांनी दिली. यासह अनुकंपाधारकांना लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठीही आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती यावेळी महापौरांनी दिली.

घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आव्हाने शिवारातील घनकचरा प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घनकचरा प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात आलेला डीपीआर आहे. मंजुरी मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याच्याही सूचना उपमहापौर यांनी दिल्या. घनकचरा प्रकल्पातील पडलेला कचऱ्यावर लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्राधान्याने या कामाला सुरुवात करून कचऱ्याला लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्याच्या सूचनाही उपमहापौरांनी दिल्या.

Web Title: Don’t let any funds go back to inactivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.