देशी-विदेशी पक्ष्यांनी वाघूर धरण परिसर बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:32+5:302021-02-05T06:01:32+5:30

२ हजार पक्ष्यांची नोंद : ‘जागतिक पाणथळ प्रदेश दिना’निमित्त निसर्गमित्रतर्फे पक्षी निरीक्षण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जागतिक पाणथळ ...

Domestic and foreign birds flourished in the Waghur Dam area | देशी-विदेशी पक्ष्यांनी वाघूर धरण परिसर बहरला

देशी-विदेशी पक्ष्यांनी वाघूर धरण परिसर बहरला

२ हजार पक्ष्यांची नोंद : ‘जागतिक पाणथळ प्रदेश दिना’निमित्त निसर्गमित्रतर्फे पक्षी निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे औचित्य साधून शहरातील निसर्गमित्रतर्फे वाघूर धरण परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम मंगळवारी घेण्यात आला. याठिकाणी देशी-विदेशी पक्ष्यांचा ६५ जाती आढळून आल्या. एकूण २ हजार २६ पक्ष्यांची नोंद या पाहणीदरम्यान करण्यात आली. अनेक स्थलांतरित पक्षी या निरीक्षणात आढळून आले. मात्र, अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा वाघूर धरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाल्याची माहिती पक्षीमित्र राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली.

२ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ प्रदेश दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून निसर्गमित्रतर्फे वाघूर धरण परिसरात पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत ६५ जातींचे २ हजार २६२ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ प्रदेशच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. पाणथळ जागी पक्ष्यांच्या किती जाती आहेत व किती संख्येने आहेत, त्यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरत असते. त्यादृष्टीने पाणथळ पक्षी गणनेचे महत्त्व आहे, अशी माहिती राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

या पक्ष्यांची झाली नोंद

गणनेत पाणथळ पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने वारकरी, मोठी लालसरी, तरंग, प्लावा, छोटा णकावळा, तलवार बदक, अटल बदक या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात नोंद करण्यात आली; तर गडवाल, तरंग थापट्या, चक्रांग, भुवई, जांभळी पाणकोंबडी, नदी सुरय, मोठाबगळा, ठिपकेवली तुतारी, कंठेरीचिखला, पाणकाडी बगळा, मोऱशराटी, काळा शराटी, नकट्या, शेकाट्या, चिखल्या, उघड चोच करकोचा, आशियाई कवडी मैना, करडा धोबी, पिवळा धोबी, पांढर्‍या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, रिचर्ड्सची तीरचिमणी पाणपक्ष्यांची नोंददेखील झाली.

या पक्ष्यांनी फिरवली पाठ

दरवर्षी हिवाळ्यात चक्रवाक, नयनसरी, शेंडीबदक, चमच्या, तिरंदाज, पाणलाव, हिरवा तुतार, छोटा आर्ली, कैकर, युरेशियन दलदल, मोठा पाणकावळा, भारतीय पाणकावळा, राखी बगळा, काळ्या डोक्याचा शराटी, रंगीत करकोचा, कांडेसर या स्थलांतरित पक्ष्यांची वाघूर धरण परिसरात मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा हे पक्षी या भागात आढळून आले नाहीत. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वदूर पाण्याची उपलब्धता आहे. यामुळे कदाचित हे पक्षी या भागात आले नसावेत, अशी शक्यता राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी व्यक्त केली.

Web Title: Domestic and foreign birds flourished in the Waghur Dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.