जळगावात मांजाने चिरला डॉक्टरचा गळा, गळ्यावर केली शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 08:59 IST2021-09-05T08:58:55+5:302021-09-05T08:59:33+5:30
जवाद अहमद हे मूळचे अमरावती येथील रहिवासी असून, शहरात ते सालारनगरात वास्तव्याला आहेत

जळगावात मांजाने चिरला डॉक्टरचा गळा, गळ्यावर केली शस्त्रक्रिया
जळगाव : महामार्गावरून दुचाकीने तांबापुरात जात असताना पतंगाच्या चायना मांजाने डॉ. जवाद अहमद (२७) यांचा गळा चिरल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. जवाद यांना एका रिक्षाचालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ११ टाके घालण्यात आले आहेत.
जवाद अहमद हे मूळचे अमरावती येथील रहिवासी असून, शहरात ते सालारनगरात वास्तव्याला आहेत. तांबापुरात त्यांनी स्वत:चे क्लिनिक सुरू केलेले आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते दुचाकीने तांबापुरा येथे जात असताना महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ खांबाला अडकलेला चायना मांजा हवेतून उडत त्यांच्या गळ्याजवळ आला. या मांजामुळे त्यांचा गळा चिरला गेला.
गळा दाबून धरल्याने रोखला रक्तस्राव
डॉ. जवाद अहमद यांचा गळा कापल्यानंतर प्रचंड रक्तस्राव झाला होता. जवाद स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी स्वतःची सुरक्षा लक्षात घेत रक्तस्राव रोखण्यासाठी गळा दाबून ठेवला. त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव रोखण्यात त्यांना यश आले. रिक्षाचालक कलीम शेख यांनी मेहरुणमधील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले.