साकेगावात धडकले जिल्हा आरोग्य पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:34+5:302021-09-04T04:21:34+5:30
प्रभाव लोकमतचा भुसावळ : साकेगावातील बालिकेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याबाबत ‘लोकमत’ने ३ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. ...

साकेगावात धडकले जिल्हा आरोग्य पथक
प्रभाव लोकमतचा
भुसावळ : साकेगावातील बालिकेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याबाबत ‘लोकमत’ने ३ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्यासह आरोग्य पथक हे साकेगावात दाखल झाले. मयत बालिकेच्या घरासह ठिकठिकाणची पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले. गावातील अजूनही एका डेंग्यूग्रस्त चिमुकलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साकेगावच्या चार वर्षीय अशीरा अमीन पटेल या चिमुरडीचा १ रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी अशीराची तब्येत बिघडल्यामुळे तिला भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तिची तब्येत अचानक खालावली व पुढील उपचारार्थ तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. अशीराच्या आईचा तीन वर्षांपूर्वी एका घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे बारा वर्षांच्या भावासह अशीराचे पालन-पोषण आजी-आजोबा करत होते. सुन्न करणाऱ्या या घटनेनंतर साकेगावात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेची दखल घेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देवराम लांडे, संसर्ग रोग अधिकारी जिल्हा परिषद डॉ. बाळासाहेब वाभडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता दवंगे, डॉ. अमोल भंगाळे, तालुका पर्यवेक्षक कैलास येवले, आरोग्य साहाय्यक एस.एन. माळी, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती फेगडे, आरोग्य पर्यवेक्षक सुनील महाजन, आरोग्य कर्मचारी नितीन चाकुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचा फौजफाटा गावात दाखल झाला.
या पथकाने गावातील गल्लीबोळात पाहणी केली व ठिकठिकाणी त्यांनी सर्वेक्षण केले. याशिवाय नागरिकांना त्यांनी जनजागृतीपर उपदेशही केले. टेकड्यावरील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील परिसरामध्ये डेंग्यूची लागण झाल्याने बालिकेचा बळी गेला आहे. या ठिकाणी पथकाने सर्वेक्षण करताना या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी पाण्याच्या टाकीखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत असून याबाबतही पथकाने नाराजी व्यक्त केली.
असे झाले सर्वेक्षण
सर्वेक्षण झालेली घरे २३८, सर्वेक्षण झालेले कंटेनर ७३७, अळीयुक्त कंटेनर २२, अळीयुक्त घरे १७, रिकामी केलेले कंटेनर १५, अँबीट टाकलेले कंटेनर ०७, घेतलेले रक्ताचे नमुने ११ याप्रमाणे नोंदी आहेत. डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यात बहुतांशी आढळतो.
या ठिकाणी होते डासांची उत्पत्ती
उघड्या ठेवलेल्या टायरमध्ये, कुलरच्या पाण्यात, नारळाच्या करवंट्या, सिमेंटचे हौद, फ्रीजचा कॉम्प्रेसरकडील भाग व साचलेले पाण्याचे ठिकाण.
खबरदारी घेणे गरजेचे
ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच पपई, किवी, ड्रॅगन फ्रुट ही फळे डेंग्यूवर प्रभावी असल्याने या फळांचे सेवन करावे.
ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र पाठवून गावात स्वच्छता तसेच एक दिवस कोरडा पाळण्यासाठी सूचना केल्या आहेत. दरम्यान, चुडामण नगर भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून येथेही त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
साकेगावात सर्वेक्षण करताना डॉ. देवराम लांडे, डॉ. संगीता पांढरे, एस.एन. माळी, सुनील महाजन.