पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:23 IST2025-12-17T16:16:58+5:302025-12-17T16:23:31+5:30
Jalgaon municipal corporation elections 2026: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. जळगावमध्ये महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. पण, पहिल्याच बैठकीत चर्चा फिस्कटली.

पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (१६ डिसेंबर) झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावरून वादंग झाला. शरद पवार गटाने वॉक आऊट केला तर उद्धव सेनेचा स्वबळाचा नारा दिला. महापालिका निवडणुकीसाठी जागांच्या तडजोडीपेक्षा दोन्ही पक्षांकडून ताकदीवर केलेला शह -काटशह अधिक प्रभावी ठरल्याने पहिल्याच बैठकीत आघाडीत बिघाडी झाली.
दीड तास चर्चा, अन् पवारांच्या राष्ट्रवादीचे वॉक आऊट
या बैठकीत मनपाच्या जागा वाटपावर प्रामुख्याने चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी आपापल्या मागण्या मांडल्या. मात्र, दीड तासांच्या चर्चेनंतरही जागा वाटपावर कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. चर्चा सुरू असताना जागांच्या विषयावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ही बैठक मध्येच सोडून दिली. त्यामुळे महाविकास आघाडीची 'आघाडी' थेट फिस्कटली आहे.
मविआच्या बैठकीत नेमके काय घडले?
महाविकास आघाडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने ३२ जागांची मागणी केली, त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १० ते १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यात उद्धव सेना व शरद पवार गटाच्या काही उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली.
जागा वाटपाच्या मुद्द्यापेक्षा या बैठकीत ज्या प्रभागांवर उद्धव सेनेकडून दावा करण्यात आला, त्याच प्रभागांमध्ये शरद पवार गटाकडूनही दावा करण्यात आला. मात्र, दोन्हीही पक्षांकडून त्या जागांबाबत शेवटपर्यंत तडजोड होऊ शकली नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या बैठकीत गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही नगरसेवक नसल्याचे सांगण्यात आले. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव सेनेची शहरात ताकद काय...? असा सवाल करण्यात आला.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे म्हणणे काय?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी म्हणाले, "मनपा निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढवायची होती, त्याच नियोजनासाठी मंगळवारी बैठक झाली. मात्र, या बैठकीत उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांना त्यांच्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन, पक्षाची शहरात ताकद असल्याचे सांगितले आहे.
"त्यांची ताकद असेलही! मात्र, या बैठकीत जागांपेक्षा कोणत्या जागा आम्ही लढवायच्या, कोणत्या जागा त्यांनी लढवायच्या, याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता चर्चा पुढे होणार नाही, आम्ही काँग्रेससोबत चर्चा करू. मात्र, उद्धव सेनेसोबत आता चर्चा होणार नाही, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.
आमची स्वबळाची तयारी
दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील म्हणाले की, "महापौर, उपमहापौर झालेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जेथे निवडणूक लढवली तेथे शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला. जे निवडून येतील, त्यांना संधी देण्याचे नियोजन होते. मात्र, शरद पवार गटाने एकतर्फी भूमिका घेतली. त्यामुळे आघाडीची चर्चा होऊ शकत नाही. त्यांची स्वबळाची तयारी असेल, तर आमचीही स्वबळाची तयारी आहे."