धूम स्टाइलने मोबाइल लांबविणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:20+5:302021-08-01T04:16:20+5:30
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील रोझ गार्डनजवळून पायी जात असलेल्या दीपक वाल्मीक मोरे यांच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या ...

धूम स्टाइलने मोबाइल लांबविणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील रोझ गार्डनजवळून पायी जात असलेल्या दीपक वाल्मीक मोरे यांच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाइलने महागडा मोबाइल चोरून नेला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला संशयितांना पकडण्यात यश आले असून, अक्षय ऊर्फ मॉडेल मुकेश अटवाल (१९, रा. चौघुले प्लॉट) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तसेच एका अल्पवयीन मुलालासुद्धा पथकाने ताब्यात घेतले आहे.
२० जून रोजी दीपक मोरे यांच्या हातातून दोन चोरट्यांनी धूम स्टाइलने मोबाइल हिसकावून नेल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरू होता. रोझ गार्डन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मानेवर टॅटू गोंधलेल्या तरुणाने चोरी केल्याचे पोलिसांना त्यात दिसून आले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. शनिपेठ भागातील चौघुले प्लॉट येथे राहणारा अक्षय ऊर्फ मॉडेल अटवाल याच्या मानेवरसुद्धा टॅटू असून, त्यानेच हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. पथकाने शुक्रवारी लागलीच त्याला ताब्यात घेऊन चौकशी घेतली. पोलीस खाकी दाखविताच त्याने अल्पवयीन मुलासोबत चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर अटवाल याला पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, चोरी केलेला मोबाइल चोरट्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, अशोक महाजन, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, संदीप साळवे, सुनील दामोदरे, दादाभाऊ पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.