लसीकरणाचे पारोळा केंद्र बंद करून आता धरणगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:17+5:302021-02-05T05:52:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी निवडण्यात आलेल्या ज्या केंद्रांवर कमी लसीकरण होत आहे, अशी केंद्र आता ...

लसीकरणाचे पारोळा केंद्र बंद करून आता धरणगाव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी निवडण्यात आलेल्या ज्या केंद्रांवर कमी लसीकरण होत आहे, अशी केंद्र आता बंद करून नवीन ठिकाणी हे लसीकरण सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पारोळा येथील केंद्र बंद करून सोमवारपासून धरणगाव येथे हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यापुढील नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात गुरूवारी ७९४ जणांनी लस घेतली. यात पारोळा येथे सलग दुसऱ्या दिवशी पंधरापेक्षा कमी लाभार्थी नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित ४,९५३ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. १४ फेब्रवारीपर्यंत जेवढे आरोग्य कर्मचारी पुढे येतील त्यांना लस दिली जाणार असून, पहिला टप्पा १४ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. जीएमसीतही लसीकरणाचे प्रमाण घटले आहे. गुरूवारी ५८ लोकांनीच लस घेतली. आता स्थानिक कर्मचारी पुढे येत नसून, खासगी आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
१४ हजारांचीच अपेक्षा
जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग बघता २० हजारांपैकी १४ हजार कर्मचारीच लस घेतील, अशी प्रशासकीय पातळीवर अपेक्षा आहे. सद्यस्थितीतील ६० टक्क्यांनुसार हा अंदाज बांधला जात आहे. यात खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.