रक्षाबंधनापूर्वीच नियतीने बांधली मृत्यूशी गाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:51 IST2020-08-03T11:51:02+5:302020-08-03T11:51:13+5:30
धक्कादायक : बहिणीला घ्यायला जाण्यापूर्वीच भावाचा तलावात बुडून मृत्यू

रक्षाबंधनापूर्वीच नियतीने बांधली मृत्यूशी गाठ !
जळगाव : दरवर्षी अगदी न चुकता हसत खेळत, मजा मस्तीत साजरा होणारा रक्षाबंधनाचा सण. अगदी यावर्षी कोरोना, लॉकडाऊन असतानाही असाच हा सण साजरा होणार होता. त्याचा उत्साहही दोन भाऊ अन् त्यांच्या बहिणीमध्ये होता. ड्युटी आटोपून भाऊ आपल्या बहिणीला सासरहून आणण्यासाठी निघणार होता. मात्र ड्युटीवरच त्याच्या आयुष्याची अखेर झाली. तिला घ्यायला जाण्यापूर्वीच ड्युटीवर असताना तलावात बुडून भावाचा मृत्यू झाला.ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीच्या समोर असलेल्या अनुभूती शाळेच्या आवारातील डिव्हाईन पार्कमध्ये घडली.
शंकर तुकाराम सपकाळे (३२, रा.मोहाडी, ता.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच भावाने जगाचा निरोप घेतल्याने बहिणीसह कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला.
सायंकाळी जाणार होता
बहिणीला घेण्यासाठी
याबाबत माहिती अशी की, मोहाडी येथील शंकर सपकाळे हा जैन व्हॅली कंपनीत वॉटर मेन्टेनन्स विभागात कामाला होता. सोमवारी रक्षाबंधन असल्याने मोठा भाऊ किशोर याने त्याला रविवारी सकाळीच बहिणीला घ्यायला जायला सांगितले. मात्र ड्युटीवर जाणे आवश्यकच असल्याने तेथून आल्यावर जाईन, असे सांगून तो सकाळीच ड्युटीला गेला. डिव्हाईन पार्कमध्ये तलावात साफसफाईचे काम करीत असताना सकाळी १०.३० वाजता आतमध्ये असलेल्या वायरमध्ये पाय अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.
वायरमध्ये अडकला पाय
शंकर याला पोहता येत होते, मात्र वायरींगमध्ये पाय अडकल्याने त्याला निघणे अवघड झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने कंपनीच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन जाधव यांनी त्याला मृत घोषित केले.
शंकरच्या पश्चात आई- वडील, पत्नी निता, मुलगा देवांश, दोन भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी महेंद्र गायकवाड व हेमंत पाटील यांनी पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी उपस्थित लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
शंकर हा नेहमी दुसऱ्यांदा मदत करीत होता. त्याच्या जाण्याने एक चांगला तरुण गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक केली.
बहिणीने बांधली अखेरची राखी
शवविच्छेदन झाल्यानंतर शंकर याचा मृतदेह मोहाडी येथे नेण्यात आला. अंत्ययात्रा काढण्यापूर्वी बहीण चंद्रभागा हिने शंकर याच्या हाताला राखी बांधली. ही राखी बांधतांना बहिणीचा आक्रोश व तेथील परिस्थिती पाहता उपस्थितीतांचाही अश्रूचा बांध फुटला. त्यानंतर स्मशानभूमीत शंकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव एकत्र आले होते.
आक्रोश करताना भाऊ बेशुध्द
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शंकरचे भाऊ किशोर, ईश्वर, वडील तुकाराम सपकाळे व गावकºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शंकरचा मृतदेह पाहताच त्यांनी एकच आक्रोश केला. यावेळी ईश्वर हा बेशुध्द झाला होता. गावातील धनंजय उर्फ डंप्पी भिलाभाऊ सोनवणे व इतर लोकांनी या कुटुंबाला सावरुन तातडीने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. शंकरचे दोघं भाऊ जैन कंपनीत नोकरीला आहे. किशोर हा टिश्युकल्चर तर ईश्वर हा सोलर विभागात आहे. आई अंजनाबाई व वडील तुकाराम सपकाळे शेती करतात. बहीण चंद्रभागा विवाहित असून जळगाव शहरातील दिनकर नगरात दिलेली आहे. तीन भावांचे कुटुंब मनमिळावू व प्रेमळ होते. रक्षाबंधनाच्या आधीच शंकरच्या या घटनेने कुटुंबासह गावाला धक्का बसला आहे.