कोरोनात जीव गमावलेल्या शिक्षकाचे कुटुंबीय हक्कापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:17+5:302021-07-23T04:12:17+5:30
विभागप्रमुख म्हणून खेडगाव खुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने सेवापुस्तिका देण्यास व पेन्शनचा ...

कोरोनात जीव गमावलेल्या शिक्षकाचे कुटुंबीय हक्कापासून वंचित
विभागप्रमुख म्हणून खेडगाव खुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळ जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने सेवापुस्तिका देण्यास व पेन्शनचा प्रस्ताव व हक्काच्या पगार देण्यास अक्षम्य विलंब, टाळाटाळ करीत आहे, असा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे.
तीन महिन्यांपासून पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष
मयत शिक्षक देवेंद्रकुमार अहिरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा हर्ष, मुलगी हेमांगी यांचे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन त्यांना मिळणारा पेन्शनचा लाभ असल्याने, याकामी तीन महिन्यांपासून शाळा मुख्याध्यापक, संस्था यांच्याकडे वांरवार लेखी, तोंडी विनवणी करूनही त्यांनी अडवणूक केल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार जिल्हाधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा उपनिबंधक यांनी मुख्याध्यापक व संस्थेला आदेश देऊनही त्यांनी त्याचे पालन केलेले नाही, असा या कुटुंबाचा आरोप आहे.
कोट
राजकीय द्वेषापोटी आरोप करून संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. पेन्शन प्रकरणाबाबत संस्थेने मुख्याध्यापक यांना कळविले आहे. त्यात त्यांनी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तरीही जि. प.कडे संबंधित प्रकरण दाखल झाले आहेत. या शिक्षकाचा पगार संस्थेने रोखला नसून त्याची खात्री या कुटुंबाने बँकेत करावी.
- विकास पंडित पाटील, चेअरमन, सर्वोदय शिक्षण संस्था