अजित पवारांच्या समोर जिल्हा राष्ट्रवादीच्या गटबाजीचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:12+5:302021-07-30T04:18:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी पार ...

Demonstration of district NCP factionalism in front of Ajit Pawar | अजित पवारांच्या समोर जिल्हा राष्ट्रवादीच्या गटबाजीचे प्रदर्शन

अजित पवारांच्या समोर जिल्हा राष्ट्रवादीच्या गटबाजीचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या तक्रारी मांडल्या. त्यात एक विरुद्ध इतर सर्व असा चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मान राखला जात नाही. तसेच त्यांच्या सोशल मीडियात त्यांची निंदानालस्ती केली जात असल्याचा आरोप बहुतांश पदाधिकाऱ्यांनी एका पदाधिकाऱ्यावर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात येऊन आढावा घेतला होता. त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन राष्ट्रवादीच्या संघटनाचा आढावा घेतला होता. त्याचा अहवाल आदिक यांनी गुरुवारी अजित पवार यांच्यासमोर मांडला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी पवार यांच्यासमोर अहवाल दिला. त्यानंतर ॲड. रोहिणी खडसे - खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बोगस रस्ते दुरुस्तीच्या कामांची तक्रार केली. यानंतर राष्ट्रवादीमधील अंतर्गत संघर्ष उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच उफाळून आला. राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी महानगर कार्यकारिणीतील एक पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना जुमानत नाही. तसेच नेत्यांना योग्य मान देत नाही. बॅनरवर फोटो लावत नाही, अशी तक्रार केली. तसेच सोशल मीडियातूनदेखील यथेच्छ निंदानालस्ती केली जात असल्याची तक्रारही या पदाधिकाऱ्याविरोधात त्याच्याच समोर करण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद करण्यात आले. अखेर जिल्ह्यातील काही नेत्यांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले.

या बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील प्रश्न व पक्ष संघटना बळकट करण्याबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, निरीक्षक अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी खासदार वसंत मोरे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवी पाटील, संजय पवार, रोहन सोनवणे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, अक्षय वंजारी, एजाज गफ्फार मलिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demonstration of district NCP factionalism in front of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.