तेली समाजातर्फे परिचय मेळाव्याचे आयोजन
जळगाव : श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजातील इच्छुकांनी ३० सप्टेंबरपर्यंत शनीपेठेतील मंडळाच्या कार्यालयात परिचय अर्ज जमा करावे, असे आवाहन मंडळाचेे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी केले आहे.
रेल्वेच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव
जळगाव : भुसावळ रेल्वे विभागातील कर्मचारी परशुराम यादव यांनी एका एक्स्प्रेस गाडी मधील बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती प्रशासनाला कळविल्यामुळे, मोठी दुर्घटना टळली होती. तसेच भुसावळ यार्डमध्ये रूळाला तडा गेल्याचा प्रकार बबलू शेख मोहिउद्दीन या कर्मचाऱ्याने निदर्शनास आणून दिला होता. कर्मचाऱ्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
शिवाजीनगरातील `त्या` कुटुंबाला मदत
जळगाव : शिवाजी नगरातील शिव मंदिराजवळ शुभम पुरोहित या व्यक्तीचे घर मंगळवारी पावसामुळे कोसळले होते. यामध्ये परिवारातील शुभम पुरोहित हे जखमी झाले होते. मात्र, घर कोसळल्यामुळे या परिवाराच्या संसार उपयोगी वस्तूही यामध्ये गेल्या आहेत. त्यामुळे बुधवारी या परिवाराला आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन,
नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ललित चौधरी यांनी घरातील संसार उपयोगी वस्तू व किराणा वस्तू सुपुर्द करून हातभार लावला.
विनामूल्य अक्युप्रेशर शिबिराचे आयोजन
जळगाव : चैतन्य अक्युप्रेशर चिकित्सालय व ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २० ते २६ सप्टेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यावर अक्युप्रेशर द्वारा विनामूल्य उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी १८ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.