बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 19:36 IST2018-11-18T19:34:57+5:302018-11-18T19:36:56+5:30
लोणवाडी येथे २० ते २२ दिवस उलटूनही पाणीपुरवठा न झाल्याने व नुकताच ओडीए योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गावावर तीव्र पाणीटंचाई संकट कोसळले आहे.

बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे तीव्र पाणीटंचाई
जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, लोणवाडी गावाची सुमारे चार हाजारांवर लोकसंख्या आहे. गावास मुक्ताईनगर येथील ओडीए योजनेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील व ओडीए योजनेच्या शेवटच्या टोकावरील लोणवाडी गावास तीव्र पाणीटंचाईची समस्या कायम भेडसावत असते. ओडीएच्या पाणीपुरवठ्यात अनियमित असल्याने व नुकताच ओडीए योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने गावास २० दिवस उलटूनही पाणीपुरवठा न झाल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी शेती परिसरातील विहिरीवरून पाणी आणावे लागते. तसेच काही नागरिक हे टँकरव्दारे पाणी विकत घेतात. त्यामुळे नागरिकांवर अधिकचा ताण पडतो.
गावात ओडीए योजनेव्यतिरिक्त येथील ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापूर्वी भारत निर्माण योजनेंतर्गत एका महाकाय विहिरीची निर्मिती केली, मात्र या विहिरीत पुरेसा जलसाठा नसल्याने व दोन ते तीन दिवसांनंतर थोड्या-थोड्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला की, तो येथील गुरांसाठी बांधलेल्या गाव हाळात सोडण्यात येतो, असे येथील सरपंच मोहन देठे यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने गावास पाणीटंचाईची झळ नेहमीच भासत असते. तरी गावात मुख्य तीन कूपनलिका असल्याने तीनपैकी दोन कूपनलिका या जलसाठ्याअभावी गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट कायम आहे.
टंचाई आढावा बैठकीत गावासाठी टी.पी.डब्ल्यू. एस.योजनेंतर्गत बोरवेलची मागणी करण्यात आली आहे. लवकरच या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
-मोहन देठे, सरपंच, लोणवाडी, ता.बोदवड