जळगाव : बीएचआर पतसंसस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे, त्याचा सहकारी सुनील झंवर हे दोघंही दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांकडे हजर झालेले नाहीत. त्यामुळे दोघांना फरार घोषीत करुन त्यांच्या तसेच नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्ता गोठविण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीने सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.
बीएचआर संस्थेतील बेकायदेशीर व्यवहारामुळे शासनाने ही संस्था २०१५ मध्ये अवसायनात काढली. अवसायक म्हणून राजपत्रीत अधिकारी जितेंद्र कंडारे याची नियुक्ती झाली. सुरुवातीपासूनच कंडारे वादग्रस्त ठरला असून स्वत:च्या अधिकारात नियम तयार करुन २० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपयांची रक्कम ठेवीदारांना देण्याचे जाहिर केले. त्याच बरोबर दुय्यम यंत्रणा तयार करुन ३० टक्केचे आमिष दाखवून संस्था बुडाली अशी भीती निर्माण करुन ठेवीदारांकडून कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या. पुण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकसत्र राबविण्यात आले. कंडारे व सुनील झंवर अद्यापही पोलिसांसमोर हजर झालेला नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषीत करावे, कंडारे याला सेवानिवृत्ती तसेच शासनाकडून देय असलेल्या इतर रक्कमा देऊ नये, त्या गोठविण्यात याव्यात. दोघांच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करुन त्या हस्तांतर होणार नाहीत यासाठी स्वतंत्र अध्यादेश काढावा, त्याशिवाय त्यांनी खरेदी केलेल्या व नंतर इतरांच्या नावे वर्ग केलेल्या मालमत्ताही गोठविण्यात याव्यात. ठेवीदारांमधूनच आता अवसायक नेमावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीने महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे व उपाध्यक्ष गिरधर डाभी यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन पाठविले आहे.