जामनेर पंचायत समिती बैठकीत कानउघडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:36+5:302021-08-01T04:16:36+5:30
जामनेर : पंचायत समितीतील प्रशासकीय अनागोंदी, शासकीय कामांसाठी नागरिकांची होत असलेली अडवणूक व अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत वाढलेल्या तक्रारींची दखल घेत ...

जामनेर पंचायत समिती बैठकीत कानउघडणी
जामनेर : पंचायत समितीतील प्रशासकीय अनागोंदी, शासकीय कामांसाठी नागरिकांची होत असलेली अडवणूक व अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत वाढलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार गिरीश महाजन यांनी शनिवारी बैठक घेतली. तब्बल तासभर चाललेल्या बैठकीत कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.
शासकीय कामांसाठी अवास्तव पैशांची मागणी करणे, सिंचन विहीर, घरकुल व वैयक्तिक शौचालयाची प्रकरणे प्रलंबित ठेवणे आदी तक्रारी वाढल्याने त्याची दखल महाजन यांनी घेतली. काही कर्मचारी लोकप्रतिनधींचेही ऐकत नाही, अशा तक्रारी सदस्यांनी केल्याने या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याचे सांगण्यात आले. सभापती सदस्य गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जामनेर पंचायत समितीत सत्ताधारी व अधिकारी यांच्यातील बेबनाव नेहमीच समोर येत आहे. माजी उपसभापती सुरेश बोरसे यांनी सिंचन विहिरींबाबत अधिकारी व कर्मचारी आमचे ऐकत नाही, परस्पर वाटप करतात असा आरोप केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांनी जे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही, ते विरोधकांचे काय ऐकणार, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मध्यंतरी महिला सभापतींच्या पतींनी कामकाज करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, पं. स. नेमकी कोण चालवतो? असे विचारून कामे होत नसतील तर राजीनामा देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. पंचायत समितीत भाजपचे बहुमत असूनही सदस्यांमध्ये कायम धुसफूस सुरू असते. याला कंटाळून भाजपचे गटनेते अमर पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
चौकशी अहवालाचे गौडबंगाल
पंचायत समितीतील गैरकारभार व अनागोंदी विरोधात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण केले होते. जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून अहवाल मागविला होता. समितीकडून अहवाल देण्याबाबत विलंब होत असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आमदार गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार आढावा बैठक झाली. यात त्यांनी विभागनिहाय कामांचा आढावा घेऊन सूचना केल्या. नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या.
- के. बी. पाटील, सहायक गटविकास अधिकारी
शासकीय कामांसाठी येणारे नागरिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटतात. कोणी त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत असेल तर आम्हाला सांगितले पाहिजे. सभापतीपद स्वीकारल्यापासून पूर्ण वेळ कार्यालयात थांबतो. कुणाची याबाबत तक्रार असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
- जलाल तडवी, सभापती, पंचायत समिती, जामनेर