पत्नीस आणण्यास गेलेल्या यावलच्या तरूणाचा नांदुरा येथे रेल्वे अपघात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 20:23 IST2018-11-20T20:22:28+5:302018-11-20T20:23:42+5:30
सासरवाडीवरून पत्नीस माहेरी परत आणण्यासाठी नांदुरा, जि.बुलढाणा येथे आणावयास गेलेल्या यावल येथील श्रीराम नगरातील २४ वर्षीय तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.

पत्नीस आणण्यास गेलेल्या यावलच्या तरूणाचा नांदुरा येथे रेल्वे अपघात मृत्यू
यावल, जि.जळगाव : सासरवाडीवरून पत्नीस माहेरी परत आणण्यासाठी नांदुरा, जि.बुलढाणा येथे आणावयास गेलेल्या येथील श्रीराम नगरातील २४ वर्षीय तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.
येथील श्रीराम नगरातील रहिवाशी संतोष भोई हे शनिवारी पत्नीस आणण्यास नांदुरा येथे गेले होते. पत्नीने मी सोमवारी येणार असल्याने संतोष भोई रविवारी सकाळी एकटेच यावल येथे येण्यास निघाले. रात्री पत्नीने यावल येथे त्यांच्या जेठास मोबाईलवरून संतोष भोई यावल येथे पोहचले काय, अशी विचारणा केली असता, त्यांनी नकार दिला. संतोष भोई यांच्या भावांनीही संतोष भोई यांच्या मोबाईलवर अनेक फोन लावले. मात्र काहीही उत्तर न मिळाल्याने सोमवारी त्यांच्या शोधासाठी भाऊ गेले. तेव्हा त्यांना रेल्वे अपघातातील एका तरूणास खामगाव येथे उपचारार्थ नेले असल्याचे कळले. यावरून त्यांनी खामगाव येथे तपास केला. तेथून त्यास अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवले असल्याचे सांगितल्याने त्यांनी अकोला येथील रुग्णालयात शोध घेतला. तेव्हा संतोष भोई हे मृतावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष भोई हे हातमजुरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.