पारोळ्याजवळ ट्रक अपघातात पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:47 IST2019-04-07T16:46:23+5:302019-04-07T16:47:17+5:30
एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपीक कैलास धनसिंग राठोड (वय ३१, रा.पाल, ता.रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथे शनिवारी रात्री साडेनऊला घडली.

पारोळ्याजवळ ट्रक अपघातात पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपिकाचा मृत्यू
पारोळा/पाल, जि.जळगाव : एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपीक कैलास धनसिंग राठोड (वय ३१, रा.पाल, ता.रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथे शनिवारी रात्री साडेनऊला घडली. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला.
सूत्रांनुुसार, पाल, रा.रावेर येथील दादासाहेब चौधरी वनप्रशिक्षण विद्यालयात लिपीक असलेले कैलास धनसिंग राठोड हे आपली सासरवाडी वसंतनगर (पिंपळकोठा, ता.पारोळा) येथे शनिवारी मोटारसायकल (एमएच-१९-बी डब्ल्यू-२५४५) ने जात होते. ते पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरून मार्गस्थ होत असताना एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडविले. ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. चेहरा चेंदामेंदा झाला. परिणामी सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही. मात्र खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना रात्रीच या घटनेबाबत माहिती दिली.
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या रुग्णवाहिकेतील चालक ईश्वर ठाकूर व रोशन पाटील यांनी, त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी भेट देत पंचनामा केला. याबाबत रात्री उशिरा अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे.