डीन बदलताच कार्यालयाचे रुपही बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:51+5:302021-09-19T04:16:51+5:30
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता नियुक्तीवरून निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. अखेर अधिष्ठाता कार्यालयातील कार्यकाळाच्या ...

डीन बदलताच कार्यालयाचे रुपही बदलले
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता नियुक्तीवरून निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. अखेर अधिष्ठाता कार्यालयातील कार्यकाळाच्या फलकावर नवे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांचे नाव लागले आहे. यासह कार्यालयाच्या मांडणीतही बदल केले जात आहेत. दरवाजावरील नावाचा फलक ३ दिवसांपूर्वीच बदलण्यात आला होता.
अधिष्ठाता यांच्या बसण्याची जागा बदलण्यात आलेली आहे. शनिवारी कार्यालयात हे काम सुरू होते. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील हे दोन दिवसांच्या रजेवर गेल्याने सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे उपअधिष्ठाता म्हणून तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या गोंधळावर पडदा पडला आहे. डॉ. रामानंद हे देखील रजेवर गेल्याची माहिती आहे.
तिसरे अधिष्ठाता म्हणून नाव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पहिले अधिष्ठाता म्हणून डॉ. भास्कर खैरे यांनी १ जुलै २०१७ रोजी पदभार घेतला होता. ११ जून २०२० पर्यंत ते पदावर होते. त्यानंतर १३ जून २०२० ते ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद हे पदावर होते. त्यानंतर ७ सप्टेंबरपासून डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी तिसरे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचे नाव कार्यालयातील फलकावर लागलेले आहे.
डॉक्टरांचे वेट ॲण्ड वॉच
डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अगदी क्वचित मंडळींनी पुढाकार घेतला; मात्र अनेक डॉक्टर्स अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. डॉ. फुलपाटील यांना भेटणे टाळत असल्याचेही चित्र आहे. डॉ. मिलिंद फुलपाटील यांना भेटून चर्चा केल्यानंतर उद्या पुन्हा डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे पदभार आल्यानंतर करायचे काय, असा प्रश्न असल्याने अद्याप अनेक डॉक्टर्सनी नवे डीन डॉ. फुलपाटील यांची भेट टाळल्याचे परिसरात बोलले जात आहे.