सीए परीक्षेत दर्शन चोरडिया चमकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:02+5:302021-09-15T04:22:02+5:30
जळगाव : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट इंडियाच्यावतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच ...

सीए परीक्षेत दर्शन चोरडिया चमकला
जळगाव : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट इंडियाच्यावतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात सीए अंतिम नवीन कोर्स दोन्ही ग्रुपमधून दर्शन ईश्वर चोरडिया हा शहरामधून प्रथम येऊन चमकला आहे. जयेश मनोज दहाड द्वितीय आणि राधाराणी श्रीगोपाळ बांगल तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती जळगाव सीए शाखाचे अध्यक्ष सीए प्रशांत अग्रवाल यांनी दिली.
सीए फाउंडेशन परीक्षेला देशभरातून ७१ हजार ९६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ त्यापैकी १९ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. सीए अंतिम जुन्या कोर्समधून पहिल्या ग्रुपसाठी एकूण १२ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यापैकी १३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. दुसऱ्या ग्रुपसाठी एकूण १७ हजार ४४ विद्यार्थी बसले होते़ त्यापैकी २१९४ विद्यार्थी पास झाले असून दोन्ही ग्रुपसाठी ३९४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच सीए अंतिम नवीन काेर्समधून पहिल्या ग्रुपमध्ये ४९ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ९ हजार ९८६ विद्यार्थी पास झाले. तर दुसऱ्या ग्रुपसाठी ४२ हजार २०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७ हजार ३२८ विद्यार्थी पास झाले असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.