अतिवृष्टी झाल्यास नाल्याकाठच्या घरात पाणी शिरण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:40+5:302021-07-28T04:16:40+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाकडून यंदा नालेसफाई केवळ नावालाच केलेली दिसून येत आहे. नालेसफाईअंतर्गत ...

अतिवृष्टी झाल्यास नाल्याकाठच्या घरात पाणी शिरण्याचा धोका
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाकडून यंदा नालेसफाई केवळ नावालाच केलेली दिसून येत आहे. नालेसफाईअंतर्गत काढण्यात आलेला गाळ ठेकेदाराने न उचलता नाल्यांच्या काठावरच लावल्यामुळे शहरात अतिवृष्टी झाल्यास नाल्याच्या काठावरील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने नालेसफाईसाठी १४ लाखांची तरतूद केली होती. मात्र, हा खर्च वाया जात असल्याचे दिसून येत आहे. कारण शहरात अवघ्या पंधरा मिनिटांच्या पावसातदेखील शहरातील उपनाले ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. गटारी व उपनाल्यांचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याचे निदर्शनास येत आहे.
याठिकाणी नेहमीच साचते पाणी
शहरातील असे काही भाग आहेत की, ज्या भागात प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नेहमीच पाणी साचत असते. यामध्ये शहरातील नवीपेठ, आकाशवाणी चौक, कोर्टचौक, स्टेडियम कॉम्प्लेक्स, अप्पा महाराज समाधी परिसर, बजरंग बोगदा, नवसाचा गणपती मंदिर परिसर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, दूध फेडरेशन परिसर, शिवतीर्थ मैदान परिसरात नेहमीच पावसाचे पाणी साचत असते.
मनपाचे तेच रडगाणे
मनपा प्रशासनाला शहरातील नालेसफाईचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारदेखील मिळत नाही. अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदाराकडून काम सुरू असून, अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीनेच ही नालेसफाई केली जात आहे. नाल्यांमधील काढलेला गाळ नाल्यांच्याच काठावर फेकला जातो. काही दिवसांत हाच गाळ पुन्हा नाल्यात जातो, तसेच अनेक भागांत साचणाऱ्या पाण्याबाबतदेखील मनपा प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
पाणी साचण्याची कारणे
१. शहरातील नवीपेठ परिसरातील नवीन सरस्वती डेअरीजवळ गेल्या २० वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचत असते. मात्र, याबाबत मनपा प्रशासनाने कधीही उपाययोजना केलेल्या नाहीत. याठिकाणची गटारीतील घाण साफ केली जात नाही.
२. प्रभुदेसाई कॉलनी परिसरालगत वाहणाऱ्या छोट्या नाल्याचीही सफाई मनपाकडून व्यवस्थित न झाल्यामुळे अवघ्या १५ मिनिटांच्या पावसातदेखील हा रस्ता पूर्णपणे गटारीच्या पाण्याखाली जातो.
३. मनपा प्रशासनाकडून होत नसलेली नालेसफाई, तसेच गटार सफाईदेखील मनपाकडून व्यवस्थित होत नसल्यानेच शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याची समस्या कायम आहे.
पाऊस नकोनकोसा...
कोट
कधीकाळी पावसाळा हा आवडता ऋतू होता. मात्र, शहरातील रस्त्यांची स्थिती पाहता व पावसाळ्यात ठिकठिकाणी नेहमी पाणी साचण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे हा पावसाळा आता नकोसा वाटू लागला आहे. जळगाव शहरात पाऊस झाल्यानंतर तर घराबाहेर पडण्याचीच हिंमत होत नाही. गटारी ओव्हरफ्लो झालेल्या असतात, तसेच रस्त्यावरदेखील प्रचंड चिखल साचलेला असतो. मनपा प्रशासनदेखील लक्ष द्यायला तयार नाही.
-कैलास पाटील, अष्टभुजानगर
मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्त्यांची तर वाट लागलीच आहे. दुसरीकडे पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने आजार पसरण्याचीही भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात जळगाव शहरात थांबावेसेदेखील वाटत नाही. पावसाळ्यापूर्वीच जर मनपाने गटारी साफ केल्या. नाल्यांची सफाई व्यवस्थित केली, तर पावसाळ्यात निर्माण होणारी समस्या निर्माण होणार नाही. मात्र, मनपाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.
-सुशील सोनवणे, इंद्रप्रस्थनगर