नशिराबाद आणि परिसरात ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:17 IST2019-11-05T12:16:28+5:302019-11-05T12:17:01+5:30
शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी : सरसकट भरपाई द्या

नशिराबाद आणि परिसरात ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नशिराबाद : अवकाळी पावसामुळे नशिराबादसह परिसरातील सुमारे ७५० हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हातातोंडाशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. यंदा पावसामुळे धान्य ,चारा, याची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.
यंदा अपेक्षेपेक्षा भरपूर पाऊस झाला. ऐन पिके काढण्याच्या तोंडावरच पावसाने संततधार चा धडाका सुरू केला. त्यामुळे शेतात उभी असलेली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात मका, ज्वारी कणसाला कोंबच फूटले, सोयाबीन खराब झाला, तर कापूस सडला. अजूनही काही शेतात पाणीच पाणी साचलेय अशा स्थितीने शेतकरी राजा बेजार झाला आहे. नशिराबाद सह परिसरात सोयाबीनचे ३०० हेक्टर, कापसाचे २५०हेक्टर, ज्वारी,मक्याचे २०० हेक्टर पर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
रब्बीची तयारी करावी कशी?
शासन उभी पिकांची पंचनामे करत असल्याने रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयारी करण्यास व्यत्यय येत आहे. पंचनामे करणाºया अधिकारी येतील तो पर्यंत ती बाधीत पिके काढता येत नसल्याने शेतकरी त्यांची वाट पाहत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी जमीन तयार करावी लागणार आह, त्यासाठी पिक पेरानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे.
दिवाळी पावसाची अन नासाडी पिकांची..
देवा पुरे झाला आता पाऊस ..अशी म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली. मात्र वरुणराजाने पाण्याचा वर्षाव करीत दिवाळी केली. मात्र शेतकरी राजाचे कंबरडे मोडीत सर्वच पिकांची नासाडी केली. हातातल्या हंगाम गेला. यंदा ओला दुष्काळाने मारले मात्र शासन तरी तारेल काय? या प्रतीक्षा आहे.
पंचनामे सुरू
नशिराबाद येथे तलाठी प्रवीण बेंडाळे, कृषी सहाय्यक प्रवीण सोनवणे, ग्रामविकासअधिकारी बी.एस. पाटील, व सहकारी पंचनामे करीत आहेत.