वादळाने उच्च क्षमतेची वीज तार रिक्षावर पडल्याने पडून जळगावात दोघांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:47 IST2018-06-07T00:47:26+5:302018-06-07T00:47:26+5:30
वादळी वा-यामुळे उच्च क्षमतेची विजेची तार तुटून रिक्षावर पडल्याने वीज प्रवाह उतरुन रिक्षाने पेट घेतला, त्यात इम्रान शेख फय्याज (वय ३५, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) व इम्रान शेख इमाम खान (वय ३०, रा.अक्सा नगर, जळगाव, मुळ रा.न्हावी, ता.यावल) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली.

वादळाने उच्च क्षमतेची वीज तार रिक्षावर पडल्याने पडून जळगावात दोघांचा होरपळून मृत्यू
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ : वादळी वा-यामुळे उच्च क्षमतेची विजेची तार तुटून रिक्षावर पडल्याने वीज प्रवाह उतरुन रिक्षाने पेट घेतला, त्यात इम्रान शेख फय्याज (वय ३५, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) व इम्रान शेख इमाम खान (वय ३०, रा.अक्सा नगर, जळगाव, मुळ रा.न्हावी, ता.यावल) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली.
पावसामुळे दुकानात न जाता रिक्षात बसले अन् काळाने झडप घातली
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री नऊ वाजता शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचवेळी इम्रान शेख फय्याज व इम्रान शेख इमाम खान हे दोन्ही मित्र मेहरुणमधील संतोषी माता चौकातील नागोरी चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले. पावसामुळे ते दुकानात न जाता रिक्षात बसून चहा पित असताना रात्री १०.३५वाजता अचानक वादळामुळे भर पावसात उच्च क्षमतेची वीज वाहिनीची तार तुटली व ती रिक्षाच्या पुढील टायरवर पडली. लोखंडाला स्पर्श झाल्याने क्षणातच रिक्षाने पेट घेतला व टायरही फुटले. यावेळी कोणाला काही कळण्याच्या आतच रिक्षात बसलेले दोन्ही इम्रान होरपळले.
नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला मृत्यू
पाऊस सुरु असताना अचानक वीज तार तुटून रिक्षा (क्र.एम.एच.१९ व्ही.६३२७) व त्यातील दोघं जण जळत असताना दुकानातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले, मात्र पाण्यात व रिक्षात वीज प्रवाह उतरल्याच्या भीतीने कुणाचीही त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत झाली नाही. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांनी रिक्षाजवळ मदतीसाठी धाव घेतली. इम्रान शेख फय्याज हा तरुण जागीच ठार झालेला तर दुसरा रिक्षा मालक इम्रान खान हा गंभीररित्या भाजला. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र रुग्णालयात प्रवेश करताच खान याचीही प्राणज्योत मालवली.
ओळख पटण्यास विलंब
घटनास्थळावर फक्त इम्रान शेख फय्याज याचीच ओळख पटली होती, दुसºया इम्रान खान याची ओळख पटलेली नव्हती. जिल्हा रुग्णालयात दोघांना आणल्यानंतर डॉक्टरांनी इम्रान शेख याला मृत घोषीत केले तर खान याचा इसीजी व इतर तपासण्यात करण्यात आल्या. त्यानंतर दहा मिनिटांनी त्यालाही मृत घोषीत करण्यात आले.