तीन दिवसांच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:54 IST2021-03-27T23:54:18+5:302021-03-27T23:54:37+5:30

किराणा, भाजीपाल्यासह होळी सणाची खरेदी :  तळीरामांकडून मद्याचाही साठा जळगाव : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाभरात लागू करण्यात आलेल्या ...

Crowds erupted in the market against the backdrop of a three-day ban | तीन दिवसांच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उसळली गर्दी

तीन दिवसांच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उसळली गर्दी

किराणा, भाजीपाल्यासह होळी सणाची खरेदी :  तळीरामांकडून मद्याचाही साठा

जळगाव : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाभरात लागू करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. किराणा, भाजीपाला खरेदी सोबतच होळी सणासाठी देखील पूजेचे साहित्य  खरेदी करण्यात आले. यासोबतच तळीरामांनीदेखील मद्याचा वाढीव साठा करून ठेवत गुटखा, तंबाखूचीदेखील तजवीज करून ठेवली. बाजारात खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे चौकाचौकात वाहतुकीची कोंडी झाली होती.

जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून संसर्ग वाढत असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विविध निर्बंध लावले जात आहे. त्यात दोन आठवड्यांपूर्वी जळगाव महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. यासोबतच चाळीसगाव, चोपडा येथेदेखील निर्बंध लादण्यात आले होते. त्यापाठोपाठ टप्प्याटप्प्याने विविध तालुक्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीने निर्बंध लागू केले. तरीदेखील रुग्ण संख्या वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८  ते ३० मार्च दरम्यान जिल्हाभरात कड निर्बंध लावण्यात आले . यामध्ये किराणा, भाजीपाला यासह सर्वच व्यवहार बंद राहणार आहे. केवळ दुध व औषध दुकाने सुरू राहणार असल्याने शनिवारी बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली.

दरोजच्या तुलनेत दीडपट विक्री
बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने किराणा साहित्य व घरात लागणाऱ्या इतर वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे दररोज होणाऱ्या व्यवहाराच्या तुलनेत दीडपटीने व्यवहार वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

संध्याकाळी गर्दीत पडली भर
बाजारपेठेत शनिवारी सकाळपासूनच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यानंतर संध्याकाळी तर अधिकच गर्दी वाढली. सुभाष चौक, महात्मा गांधी मार्केट, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, यासह शहरातील कॉलनी भागात देखील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

वाहतुकीची कोंडी
नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडल्याने रस्त्यांवर तसेच चौकाचौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यामध्ये चित्रा चौक, कोर्ट चौक, टाॅवर चौक, घाणेकर चौक, बळीराम पेठ इत्यादी भागात वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.

होळीच्या पूर्वसंध्येला दिवाळी सारखी गर्दी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ज्याप्रमाणे खरेदीसाठी गर्दी उसळते त्याप्रमाणेच तीन दिवसांच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी संध्याकाळी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. तीन दिवसानंतर पुन्हा निर्बंध वाढतात की काय या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. महिला पुरुष देखील खरेदीसाठी बाहेर पडल्याने रस्त्या-रस्त्यांवर गर्दी दिसत होती. रविवारी होळी सण असून होळीच्या पूर्वसंध्येला जणू दिवाळीची खरेदी सुरू आहे की काय असे चित्र शहरात दिसून आले.

पूजा साहित्य खरेदी
बंदच्या पार्श्वभूमीवर किराणा, भाजीपाला खरेदीसह नागरिकांनी होळी सणासाठी लागणाऱ्या पूजेचे साहित्य देखील खरेदी केले. यामध्ये हार कंगन, नारळ, फुल व इतर वस्तू घेऊन होळीच्या पूजेची तयारी करून ठेवली.

मद्याच्या दुकानावर खरेदीची लगबग
गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात मद्याची दुकान बंद राहिल्याने अनेक दिवस तळीरामांना आपला घसा कोरडा ठेवावा लागला होता. हा अनुभव पाहता यावेळी तळीरामांनी मद्याच्या दुकानावर शनिवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली. यामध्ये सकाळपासूनच अनेकांनी साठा करण्यास सुरुवात केली व संध्याकाळी तर अधिकच गर्दी वाढली होती. यासोबतच पानटपऱ्या देखील बंद राहणार असल्याने अनेकांनी गुटखा, सिगारेट, तंबाखू यांचीही खरेदी करून ठेवली.

भाजीपाला महागला
तीन दिवस निर्बंध राहणार असल्याने शनिवारी शहरात अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाजीपाल्याची मागणी वाढल्याने त्यांचे दर देखील शुक्रवारच्या तुलनेत दीड पटीने वाढले.

Web Title: Crowds erupted in the market against the backdrop of a three-day ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव