कोरोनानंतर पशुपालकांसमोर जनावरांवरील विषाणूचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:48+5:302021-09-12T04:19:48+5:30
अगोदरच मागील दोन वर्षांपासून शेतकरी, पशुपालक यांना कोरोनामुळे खरेदी-विक्री, आर्थिक आदी अडचणींना तोंड द्यावे लागत असून, या नव्या संकटाने ...

कोरोनानंतर पशुपालकांसमोर जनावरांवरील विषाणूचे संकट
अगोदरच मागील दोन वर्षांपासून शेतकरी, पशुपालक यांना कोरोनामुळे खरेदी-विक्री, आर्थिक आदी अडचणींना तोंड द्यावे लागत असून, या नव्या संकटाने पशुपालकांमधे खळबळ उडाली आहे.
परदेशातून एक वर्षापूर्वी भारतात आलेल्या या विषाणूने आता गिरणा खोऱ्यात शिरकाव केला आहे. लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) हा विषाणूजन्य रोग जनावरांच्या कातडीला होतो. या विषाणूच्या हल्ल्यामुळे सुरुवातीला जनावरांना ताप येतो. यानंतर शरीराच्या त्वचेवर फोड येतात, ते फोड फुटतात. जखमा होतात. खपल्या निघतात. जनावर चारा खाणे सोडते, अशक्त होते व दगावते.
देवीसदृश रोगाची लक्षणे यात दिसतात. डास, चिलटे, माश्या, गोचडी यांच्याद्वारे व अशा जनावरांच्या संपर्कातून तो दुसऱ्या जनावरांमध्ये पसरतो. यामुळे मोठी चिंता वाढली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून पिंप्रीहाट, खेडगाव, पिचर्डे व गिरणा काठालगतच्या इतर गावांत त्याचा फैलाव झाला. पिंप्रीहाट येथील एका शेतकऱ्याची ७०-८० हजाराची संकरित गाय या विषाणूच्या हल्ल्यामुळे दगावल्याने चिंता वाढली आहे.
खेडगाव येथील नाना मुरलीधर हिरे या शेतकऱ्याच्या एका खिलार बैलावर ऐन शेतीकामाच्या दिवसात या विषाणूचा हल्ला झाला आहे. जवळजवळ ६०-७० हजारांचा हा बैल विषाणूच्या हल्ल्यामुळे जखडला गेला आहे. रोजच्या औषधोपचारासाठी दोन हजारांवर खर्च करूनही बैल जागचा उठलेला नाही. पिचर्डे येथेही एका शेतकऱ्याच्या दुभत्या गायीला या विषाणूची बाधा झालेली आहे. खासगी पशुवैद्यकांकडेच पशुपालक उपचार घेत आहेत. यामुळे निश्चित किती जनावरांवर या विषाणूजन्य रोगाचा प्रसार झाला, ही माहिती उपलब्ध होवू शकत नाही.
अंदाजे पंधरा-वीस जनावरांच्यावर ही संख्या आहे. शासनाचा पशुवैद्यक विभागाकडून अद्याप काही हालचाल नसल्याने एकंदरच या विषाणूजन्य रोगाविषयी ते अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
ना लस, ना ठोस उपचार
कोरोनासम जनावरांमधील या विषाणूजन्य रोगावर अद्याप लस व ठोस उपचार उपलब्ध नाही. विशेष म्हणजे हा विषाणूजन्य रोग शेळ्या-मेंढ्यांना होत नाही. फक्त गायी, बैल, वासरे यांनाच होतो. म्हशींवर कमी प्रमाणात होतो. या विषाणूची बाधा झालेल्या जनावरांवर उपचारासाठी ताप कमी होण्याची औषधे, प्रतिजैविके, जीवनसत्त्वे, वेदनाशामकांचा वापर हीच पध्दत आजमितीस वापरली जाते. जनावरांच्या त्वचेवरील फोडांना जंतुनाशक मलमे, कापूर, हळद लावणे, पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करणे, विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अशी जनावरे इतंरापासून दूर बांधणे, चारापाणी वेगळा ठेवणे, माश्या, डास, चिलटे, गोचीड याद्वारे तो पसरत असल्याने गोठ्यात व इतर निरोगी जनावरांवर प्रतिबंधक कीटकनाशक फवारणे, अशी काळजी घेण्याविषयी माहिती काही खासगी पशुवैद्यकांनी ‘लोकमत’ला दिली.
लम्पी स्किन डिसीजबाधीत खेडगाव येथील खिलार बैल व पिचर्डे येथील एक गाय.