सहा फुटांची मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकाराविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:14+5:302021-09-11T04:19:14+5:30
जळगाव : सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार, तर घरगुतीकरिता दोन फुटांची गणेश मूर्ती असावी, अशा सूचना असतानासुद्धा सहा फुटांची ...

सहा फुटांची मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकाराविरुद्ध गुन्हा
जळगाव : सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार, तर घरगुतीकरिता दोन फुटांची गणेश मूर्ती असावी, अशा सूचना असतानासुद्धा सहा फुटांची गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तिकाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना चार फुटांची, तर घरांमध्ये दोन फुटांपर्यंत गणेश मूर्तीची स्थापना करावी, अशी मर्यादा शासनाने घालून दिली आहे. तसे असतानाही मेहरुण परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ चंद्रकांत प्रकाश वरणे हा मूर्तिकार सहा फुटांची गणेश मूर्ती विक्री करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना गुरुवारी रात्री मिळाली. साडेदहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी मेहरुण गाठले. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती गणेशमूर्ती विक्री करताना दिसून आली. दुकानात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सहा गणेश मूर्ती सहा फुटांच्या आढळून आल्या, तर मूर्तिकाराचे नाव विचारले असता, त्याने चंद्रकांत वरणे (वय ३८) असे सांगितले. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केले म्हणून मूर्तिकाराविरुद्ध पोलीस कर्मचारी मंदार पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.