मविप्रचे नीलेश भोइटे, प्राचार्य देशमुखांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:05+5:302021-08-01T04:16:05+5:30
जळगाव : मविप्र संस्थेच्या नूतन मराठा ज्युनिअर महाविद्यालयामध्ये बनावट मस्टर बनवून त्यावर कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी चार वर्षांची हजेरी दाखवून ...

मविप्रचे नीलेश भोइटे, प्राचार्य देशमुखांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : मविप्र संस्थेच्या नूतन मराठा ज्युनिअर महाविद्यालयामध्ये बनावट मस्टर बनवून त्यावर कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी चार वर्षांची हजेरी दाखवून शासनाच्या कोट्यवधींच्या फसवणुकीचा कट रचल्याप्रकरणी नीलेश भोइटे, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्यासह आठ जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूतन मराठा महाविद्यालयात बनावट मस्टर बनवून काही शिक्षकांच्या सह्या घेत २०१७ पासून ते आजपावेतोची हजेरी दाखविण्याचा कट स्व. नरेंद्र अण्णा पाटील गटाकडून १९ जुलै रोजी उधळण्यात आला होता. त्याचवेळी बनावट मस्टर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. चौकशीअंती दहा दिवसांनंतर याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अॅड. विजय भास्कर यांनी फिर्याद दिली आहे. १९ जुलै रोजी अॅड. विजय पाटील हे संस्थेच्या कार्यालयात बसलेले असताना त्यांना नूतन मराठा ज्युनिअर महाविद्यालयातील उपप्राचार्य ए. बी. वाघ यांच्या केबिनमध्ये सायंकाळी पाच महिला व दोन पुरुष अशा एकूण सात अनोळखी व्यक्ती तसेच उपप्राचार्य ए. बी. वाघ, प्रकाश आनंदा पाटील, शिवराज माणके हे सर्व जण केबिन बंद करून खोटे व बनावट मस्टर तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वाघ यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला मात्र, त्यांनी कॉल उचलला नाही. अखेर अॅड. पाटील, वसंत चौधरी, पीयूष पाटील व यश चौधरी यांनी उपप्राचार्य यांचे केबिन गाठले. त्यावेळी ते सात अनोळखी व्यक्ती व संस्थेतील चार कर्मचारी जुने कॅलेंडर घेऊन मस्टरवर खोट्या सह्या करीत असल्याचे आढळून आले. त्यातच नीलेश भोइटे व प्राचार्य प्रा़ डॉ़ एल़ पी़ देशमुख यांच्या सांगण्यानुसार चार वर्षांचे सह्यांचे मस्टर तयार करून देत आहोत, शासनाकडून मान्यता घेऊन पगार काढून देणे हा व्यवहार वेगळा राहील, अशीही चर्चा त्या लोकांमध्ये सुरू असल्याचे अॅड. पाटील यांनी फिर्यादित म्हटले आहे. त्यानंतर दरवाजा उघडत त्यांनी केबिनमध्ये प्रवेश केला होता.
केबिनमधून काढला पळ
चार वर्षांच्या सह्या करून आपण शासनाची फसवणूक करीत असल्याचे सांगितल्यानंतर केबिनमधील त्या व्यक्तींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर मस्टरची पाहणी केली असता, त्यावर जून ते जुलैपर्यंतच्या सह्या केलेल्या आढळून आल्या. अॅड. पाटील यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली व मस्टर पोलिसांच्या स्वाधीन केले.
दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल
मस्टर ताब्यात घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर संबंधितांचे म्हणणेसुद्धा मागविले होते. त्यानंतर पाटील यांच्या फिर्यादीवरून शासनाची फसवणूक करण्याचा कट रचल्याप्रकरणी नीलेश रणजित भोइटे, प्राचार्य प्रा.डॉ. लक्ष्मण प्रताप देशमुख, उपप्राचार्य ए. बी. वाघ, शिवराम माणके, प्रकाश आनंदा पाटील, एम. ए. धामणे, एन. एस. गावडे आणि ए. एस. भोळे यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.