जळगाव : मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेच्या गोपनीय कामाच्या नावाखाली अव्वाच्या सब्वा बिले सादर करण्यात आली होती. त्यामुळे यात आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता असून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सर्व शक्ती सेना संघटनेतर्फे राज्यपाल अर्थात कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांची पाच कोटी तीन लाख ७५ हजार रुपयांची बिले मक्तेदाराकडून सादर करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार कोणतेही काम पूर्ण करण्याअगोदर वर्तमापत्राद्वारे निविदा प्रक्रियाबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाते. परंतु, या सर्व नियमांची अंमलबजावणी न करता विद्यापीठाने मक्तेदाराला धनादेश अदा केले. तिसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन बिलाची रक्कम दोन कोटी आठ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे. वास्तविक ऑनलाइन परीक्षेपेक्षा ऑफलाइन परीक्षेचा खर्च जास्त असतो. परंतु, यात उलट झाले आहे. ऑनलाइन परीक्षेचा जास्त खर्च दाखविण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला असून, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना सर्व शक्ती सेनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे, किरण निजाई, किरण वैद्य, सर्व शक्ती सेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे, आदींची उपस्थिती होती.