CoronaVirus in Jalgaon: ‘कोरोना’चा जळगावात शिरकाव; पहिला रुग्ण आढळल्यानं चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 10:06 IST2020-03-28T23:10:46+5:302020-03-29T10:06:34+5:30
मेहरूण’मध्ये पहिला रुग्ण सापडल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर

CoronaVirus in Jalgaon: ‘कोरोना’चा जळगावात शिरकाव; पहिला रुग्ण आढळल्यानं चिंतेत वाढ
जळगाव: जळगावात शनिवारी ‘कोरोना’चा पहिला रुग्ण आढळला. मेहरूण येथील एका ४९ वर्षीय इसमाला ‘कोरोना’ झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी उशिरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यामुळे ‘आरोग्य यंत्रणा’ अलर्ट करण्यात आली आहे.
जळगावच्या मेहरुण परिसरात राहणारा हा इसम दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून आला आहे. मुंबईत तो एका चारचाकीवर चालक म्हणून काम करतो. घशात त्रास होऊ लागल्याने शुक्रवारी दुपारी त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यात तो कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तो काही दिवस दुबई येथे होता, अशी चर्चा आहे.
जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी तीन जण संशयित म्हणून दाखल झाले होते. त्यात मेहरूण येथील ४९ वर्षीय इसमाचाही समावेश होता. शुक्रवारी दाखल झालेल्या उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण सापडल्याने जळगावात मोठीच खळबळ उडाली आहे.
सील केलेल्या कक्षात उपचार
दरम्यान, या कोरोनाग्रस्त रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्षात ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात उपचार सुरु आहेत. हा कक्ष पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
पॉझिटिव्ह असलेला हा रुग्ण जळगावातील मेहरुण परिसरातील रहिवासी आहे. त्यामुळे हा भाग सॅनेटाईज करण्यात येईल. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही १४ दिवस कोरोना कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येईल.
- एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव.
पॉझिटिव्ह अहवाल आलेला हा रुग्ण मुंबईहून परतला आहे. त्याची आणखी माहिती घेतली जात आहे.
- डॉ. भास्कर खैरे, डीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. जळगाव.