CoronaVirus जळगावात आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 22:53 IST2020-04-01T22:52:44+5:302020-04-01T22:53:10+5:30
पाच दिवसात दोन रुग्ण : दोन आठवडे अधिक काळजीचे

CoronaVirus जळगावात आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर फैलावत असून बुधवारी जळगाव जिल्ह्यातील अजून एका रूग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या दोन झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली. या पूर्वी शनिवार, २८ मार्च रोजी जळगावातील मेहरुण भागातील एका ४९ वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पाच दिवसात येथे कोरोनाचे रुग्णांचा आकडा दोनवर पोहचला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन असूनही जळगाव जिल्ह्यातील नागरिक लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले असून ही गंभीर बाब आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून येणारे दोन आठवडे अधिक काळजीचे असल्याने जळगाव जिल्हावासियांनी घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
जीवनावश्यक वस्तूचा कुठलाही तुटवडा भासणार नाही. त्यामुळे त्या घेण्यासाठी गर्दी करू नये. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनची साखळी अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
जळगावातील सालार नगर भागातील रहिवासी असून त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे.