फैजपुरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 13:13 IST2020-05-30T13:09:01+5:302020-05-30T13:13:28+5:30
उपाययोजनांना वेग : पोलीस अधिकाºयानंतर आणखी एक नागरिक बाधित

फैजपुरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा रुग्ण
फैजपूर, ता. यावल : यावल तालुक्यातील फैजपूर येथील पोलीस अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट होताच त्याच्या काही तासानंतर शहरात आणखी एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे प्रशासनाने शनिवारी सकाळी जाहीर केले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे. कोरोनाबाधित दोघी महिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या फैजपूर शहरात कोरोनाने पुन्हा शिरकाव झाला आहे.
दरम्यान पोलीस अधिकारी राहत असलेला शिवाजीनगर परिसर पालिका प्रशासनाने सील करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या परिवाराला क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले. तसेच फैजपूर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
फैजपूर येथील पोलीस अधिकारी कोरोना बाधीत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी रात्री या अधिकाºयाला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी त्यांना धीर देण्यासाठी स्वत: डीवायएसपी नरेंद्र्र पिंगळे तसेच मुख्याधिकारी किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.
शनिवारी सकाळी शहरातील आणखी एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हा बाधित रुग्ण राहत असलेला एक किलोमीटर परिघाचा परिसर पालिका प्रशासनाने सील करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वांरंटाईन करण्यात येणार असून परिसरातील सर्व घरांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिले आहे.
शहरातील व्यापार व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असताना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याने शहरवासीयांनी नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे