लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूने आता सर्वत्र हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरातील आयडीबीआय बँकेनंतर आता सेंट्रल बँकेतही कोरोनाने एंट्री केली आहे. या ठिकाणी एक अधिकारी बाधित आढळल्याने नवीपेठेतील शाखा बंद केली होती. यासह जिल्हा परिषदेत तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या पत्नींनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आयडीबीआय बँकेचे शनिवारी आठ कर्मचारी बाधित आढळल्यानंतर ही शाखाच बंद करण्यात आली होती. यानंतर आता नवी पेठेतील सेंट्रल बँकेवरही नोटीस लावण्यात आली असून कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने शाखा बंद असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. शाखेतील एक सहायक व्यवस्थापक बाधित असून अन्य दोघांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. दक्षता म्हणून बँक बंद ठेवण्यात आली आहे.
कोट
एक अधिकारी बाधित असल्याने शिवाय दोघांना लक्षणे असल्याने आज सेंट्रल बँकेची शाखा बंद होती. त्या दोन कर्मचाऱ्यांचे अहवाल आल्यानंतर शाखा उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, ते कर्मचारी निगेटिव्ह असल्यास बँक सॅनिटाईझ करून सुरू करण्यात येईल.
- एम. के. सिंग, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक
लस घेतल्यानंतर न्यायाधीश बाधित
जिल्हा न्यायालयातील एक महिला न्यायाधीश, एक पुरुष न्यायाधीश आणि न्यायाधीशांच्या पत्नी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, या न्यायाधीशांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
एलआयसीत दक्षता
एलआयसीच्या मुख्य शाखेतील एक प्रमुख अधिकारी बाधित आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या शाखेत गर्दी होत असली तरी कर्मचाऱ्यांनी दोऱ्या बांधून अंतर पाळण्याचे आवाहन करणारे फलक लावून ठेवले आहे.
जि.प.त पुन्हा धडक
जिल्हा परिषदेतील सुमारे ४० अधिकारी, कर्मचारी बाधित आढळून आले होते. या कार्यालयात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. यात सामान्य प्रशासन विभागातील एक अधिकारी, एक कर्मचारी तर एक वाहनचालक बाधित आढळून आले आहेत. यामुळे आता दक्षता म्हणून मुख्य द्वार बंद करून प्रत्येक येणाऱ्याची तपासणी केली जाणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी सायंकाळी जि.प. फिरून तीन ते चार कर्मचाऱ्यांना विनामास्क असल्याने पाचशे रुपयांचा दंडही ठोठावला.