लोकमत न्यूज नेटवर्क
वरणगाव, ता. भुसावळ : शहराची गढूळ पाण्याची समस्या सोडवून नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या मागणीचे निवेदन राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने नगरपरिषदेस देण्यात आले.
वरणगाव शहरात सध्या दहा-पंधरा दिवसाआड, अनियमित व गाळमिश्रित गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्याकरिता नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. त्यावर शहराध्यक्ष अशफाक काझी, पंकज पाटील, राजेश काकाणी, राजेंद्र पालीमकर, कल्पना तायडे आदींसह पदाधिकाऱ्याच्या सह्या आहेत.
पाणी गाळून व उकळून प्यावे
याबाबत कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी व पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे म्हणाले, तापीला आलेल्या पुरामुळे थोडे गढूळ पाणी येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे.