जळगावातील काँग्रेसचे पदाधिकारी स्वत:चा आत्मविश्वास गमावलेले - माजी मंत्री अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:17 IST2018-07-28T13:16:31+5:302018-07-28T13:17:28+5:30
निवडणुकीतील आमची शर्यत लंगड्या घोड्यावर

जळगावातील काँग्रेसचे पदाधिकारी स्वत:चा आत्मविश्वास गमावलेले - माजी मंत्री अब्दुल सत्तार
जळगाव : कोणतीही निवडणूक लढविण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. मात्र जळगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे तो नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मी कमी पडलो. जळगाव महापालिकेत काँग्रेसचा निवडणुकीतील सहभाग म्हणजे लंगड्या घोड्यावरील शर्यत असल्याचे हताश उद्गार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
नवीन बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी उपस्थित होते.
मी स्वत: कुठं तरी कमी पडलो
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मी स्वत: मेळावा घेऊन येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले, मात्र येथील पदाधिकारी हे आत्मविश्वास गमावलेले आहेत. त्यासाठी मी स्वत: कुठं तरी कमी पडलो अशी कबुली त्यांनी दिली.
सहा महिन्यात राजकारण बदलेल
निवडणुकीनंतर मी जेव्हा परत जळगावात येईल त्यावेळी मी नवीन पर्याय शोधण्यासाठी येणार आहे. पुढील सहा महिन्यात जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचे समिकरणे बदलेली असतील असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पदाधिकाºयांसमोर हात टेकले
जळगाव महापालिकेसाठी काँग्रेस पक्षाची आम्ही व्यूहरचना तयार केली होती. त्यानुसार येथील काँग्रेस पदाधिकाºयांनी कुटुंबातील सदस्यांना किंवा नातेवाईकांना उमेदवारी देण्याबाबत आवाहन केले होते. मात्र तसे झालेच नाही. एकाही पदाधिकाºयांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला किंवा नातेवाईकाला काँग्रेसकडून उमेदवारी दिली नाही. येथील काँग्रेस पदाधिकाºयांसमोर आपण हात टेकल्याचेही त्यांनी सांगितले.
जिंकण्यासाठी नव्हे तर केवळ दाखविण्यासाठी मैदानात उतरले
जळगावातील काँग्रेसचे पदाधिकारी हे निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर केवळ दाखविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या सर्व गोष्टींचा एकत्रित अहवाल प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठविणार आहे. मी निवडणुकीपुरता या ठिकाणी आलेलो नाही. काही दिवसानंतर पुन्हा येऊन स्थानिक काँग्रेस नेत्यांना सक्षम पर्याय तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किंगमेकर होता येईल इतक्या जागांवर विजय मिळविणार
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षाला मानणारा वर्ग आहे. पण ते आम्हाला सर्वसामान्यांच्या मनामध्ये बिंबविता येत नाही. सध्या आमची लाट देखील नाही. त्यामुळे आमची शर्यत ही लंगड्या घोड्यावर आहे. त्यातही ३ ते ४ प्रभागातील आमच्या उमेदवारांची स्थिती चांगली आहे. जास्त जागा आम्ही जिंकणार नाही. पण किंगमेकर होता येईल इतक्या जागांवर आमचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.