बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या विभाग प्रमुखांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:05+5:302021-07-27T04:18:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीला वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या विभाग ...

बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या विभाग प्रमुखांना तंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीला वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या विभाग प्रमुखांवर नाराजी व्यक्त केली. काही विभागप्रमुख सुटीवर होते, तर काही वेळेत न आल्याने अखेर बैठक रद्द करून ही बैठक आता बुधवारी २८ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, वेळेवर उपस्थित न राहिलेल्या विभागप्रमुखांना नोटीस देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
नवनियुक्त सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी सोमवारी सर्व विभागांचा आढावा घेण्यासाठी सकाळी दहा वाजता आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी खैरनार यांचीच उपस्थिती होती. यातील सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे हे दोन दिवसांच्या सुटीवर गेलेले आहेत. मात्र, उर्वरित विभागप्रमुख हे वेळेवर बैठकीला हजर नव्हते. यावेळी सीईओ डॉ. आशिया यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागप्रमुखांना नोटीस देण्यात आल्या असून, एक दिवसाचा पगार का कपात करण्यात येऊ नये, अशी विचारणा झाल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सीईओ डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी ही नियमित बैठक होती. काही विभागप्रमुख सुटीवर असल्याने बैठक बुधवारी ठेवल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.