Confusion in GS meeting over cancellation of membership | दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यावरून ग.स.च्या सभेत गोंधळ
दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यावरून ग.स.च्या सभेत गोंधळ

जळगाव : सोशल मीडियावर संस्थेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत माजी संचालक रावसाहेब मांगो पाटील व योगेश सनेर या दोन जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव रविवारी झालेल्या ग.स.च्या सभेत मंजूर करण्यात आला. या मुद्यावरुन सभेत चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत १३ विषयांना मंजुरी देत अवघ्या पंधरा मिनिटात सभा आटोपती घेतली.
नूतन मराठा महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग.स.ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, विलास नेरकर, गटनेते तुकाराम बोरोले, अनिल पाटील, सुभाष जाधव सुनील पाटील, नथ्थू पाटील, सुनील पाटील, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, संजय पाटील, दिलीप चांगरे, संजय ठाकरे, सुभाष पाटील यांच्यासह सहकार गटाचे संचालक उदय पाटील, अजबसिंग पाटील, रागिणी चव्हाण, महेश पाटील, विद्यादेवी पाटील, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
पुढच्या वर्षी १० टक्के लाभांश देण्याचे आश्वासन
सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष मनोज पाटील यांनी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडला. नेहमीप्रमाणे संस्थेकडून छापण्यात आलेला अहवाल यंदा न छापता केवळ चार पानी अहवाल छापल्याने यंदा ११ लाखांची बचत झाल्याचा दावा त्यांनी केला. सहकार कायद्यातील नवीन सूचनेप्रमाणे यंदा संस्थेला १०० कोटी रुपयांचा ठेवी परत कराव्या लागल्याने झालेल्या नफ्यात १ टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदा जरी सदस्यांना ७ टक्के लाभांश देण्यात आला असला तरी पुढील १० टक्के लाभांश देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. वर्षभरात संस्थेत ५० लाख रुपयांची बचत करून दाखविण्याची हमी मनोज पाटील यांनी सभेत दिली.
ठराव क्रमांक १२ येताच वादाला सुरुवात
१३ पैकी ११ ठरावांना सत्ताधारी संचालकांकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर रावसाहेब पाटील व योगेश सनेर या दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा बाबतचा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आल्यानंतर रावसाहेब पाटील यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध नोंदविला. यावरुन सभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. हा वाद पोलिसांकडून आटोक्यात आणला जात असताना, या गोंधळातच या ठरावाला बहूमताने मंजुरी दिल्याने गोंधळात अधिक भर पडली. त्यामुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
गोंधळातच राष्टÑगीतही आटोपले
रावसाहेब पाटील यांच्या प्रगती गटाकडून जोरदार घोषणाबाजी होत असताना, सत्ताधाऱ्यांनी राष्टÑगीताला सुरुवात करून दिली. या गोंधळातच राष्टÑगीतही आटोपण्यात आले.
पोलीस व सदस्यांमध्ये चकमक
सभा संपल्यानंतर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरुच होती. पोलीसांनी वाद शांत करण्यासाठी प्रगती गटाच्या सदस्यांसह इतरांना सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असताना, काही सदस्यांकडून काही कागदपत्रे व्यासपीठाकडे फेकण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांनी सदस्यांना धक्के मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असताना काही सदस्यांनी पोलीसांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावर नियंत्रण करण्यासाठी बाहेर लावण्यात आलेला बंदोबस्त देखील सभागृहात आणून हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांनी मैदानावर घेतली प्रति सभा
सर्वसाधारण सभा संपल्यानंतर विरोधकांना बोलू न दिल्याने प्रगती गटाच्या सदस्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा घेवून सत्ताधाºयांचा निषेध केला. हा ठराव आणि नोकरभरतीविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसहकार गटाची बैठक उधळली
सभा सुर होण्याआधी सकाळी ११ वाजेपासून महाविद्यालयाच्या सभागृहातच लोकसहकार गटाची बैठक सुरु होती. ही बैठक सुरु असतानाच प्रगती गटाचे शंभरहून अधिक सदस्य जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात आले. आधी पोलिसांनी या सदस्यांना सभागृहात न जाण्याचा सूचना दिल्या. मात्र, पोलीसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत प्रगती गटाचे सदस्य सभागृहात आले. लोकसहकार गटाची बैठक सुरु असतानाच विरोधी गटाचे सदस्य आल्याने सत्ताधाºयांनी आपल्या गटाची बैठक आटोपती घ्यावी लागली.
 

Web Title: Confusion in GS meeting over cancellation of membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.