लेखापरिक्षणातील गंभीर शे-यांचा शोध व सुधारणासाठी समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:16+5:302021-07-14T04:19:16+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्याठाची नुकतीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. ...

लेखापरिक्षणातील गंभीर शे-यांचा शोध व सुधारणासाठी समिती गठीत
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्याठाची नुकतीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. मात्र, लेखापरिक्षण अहवालावर अधिसभा सदस्यांनी आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपांचा अभ्यास करून प्रतिकुल व गंभीर शे-यांचा शोध घेण्यासह त्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती गठीत करण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये लेखापरिक्षण अहवाल सादर केल्यानंतर प्रा.डॉ. एकनाथ नेहते यांनी लेखापरिक्षणाच्या शे-यावर चर्चेची मागणी केली होती. चर्चेवेळी प्रा. प्रकाश पाठक यांनी लेखापरिक्षण अहवालातील ट्युशन फी, परीक्षा फी माफीमुळे तसेच भुसंपादन व इतर न्यायालयीन प्रकरणांमुळे विद्यापीठाच्या महसुलावर परिणाम झाल्याचे सभेत सांगितले होते. तसेच गंभीर शेरे असल्यामुळे लेखापरिक्षण अहवाल मंजूर करता येणार नाही, असे सभागृहात प्रा.पाठक व नेहते यांनी सांगितले होते. त्यानुसार अहवावर झालेल्या आक्षेपांचा अभ्यास करण्यासाठी व त्यातील त्रुटी दुरूस्तीसाठी समिती गठीत करण्यात येईल, असे अधिसभा सभागृहात प्रभारी कुलगुरू ई.वायुनंदन यांनी सांगितले होते.
यांचा आहे समितीत सहभाग
आर्थिक वर्ष २०१९-२०च्या लेखापरिक्षण अहवालाच्या अनुषंघाने प्रभारी कुलगुरू यांनी शनिवारी समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून प्रकाश पाठक (धुळे) तर सचिव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून राजेंद्र जाखडी (धुळे), अनिल पाटील (रावेर) यांचा समावेश आहे.
लेखा परिक्षण अहवालात त्रृटी आहेत. त्या त्रुटींच्या दुरुस्तीसाठी समिती नेमण्यात येईल असे चुकीचे विधान प्रसार माध्यमांना वित्त व लेखा अधिका-यांनी दिले होते. लेखापरिक्षकांचे गंभीर स्वरूपाचे शेरे असल्यामुळे लेखापरिक्षण अहवाल सभेत स्वीकारलेला नव्हता. त्यामुळे कुलगुरुंनी अहवालातील प्रतिकुल आणि गंभीर शे-यांबाबत समिती नियुक्ती केलेली आहे. समिती अहवाल तयार करून कुलगुरू यांच्याकडे सादर करेल. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेला अनुपालन अहवाल तयार करून पुढील अधिसभेत सदर लेखा परिक्षण अहवाल मंजुरीसाठी ठेवावा लागेल.
- प्रा.डॉ. एकनाथ नेहते, अधिसभा सदस्य