अत्तरदे यांच्यासोबतच्या वादानंतर आयुक्त १० दिवसांच्या रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:48+5:302021-07-31T04:17:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व भाजप पदाधिकारी चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात वाद ...

अत्तरदे यांच्यासोबतच्या वादानंतर आयुक्त १० दिवसांच्या रजेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व भाजप पदाधिकारी चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात वाद झाल्यानंतर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे दहा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. या रजेचे कारण जरी वैयक्तिक असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत असले तरी या रजेच्या मागे या वादाचीही पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मनपा आयुक्त दहा दिवस रजेवर गेल्याने मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर आता नागरिकांकडून मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दीपक कुमार गुप्ता यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात निषेध व्यक्त केल्यानंतर, राष्ट्रवादीकडूनदेखील अनोख्या पद्धतीने मनपा आयुक्तांच्या दालनात गांधीगिरी केली होती. त्यानंतर रस्त्यांच्याच प्रश्नावर मंगळवारी भाजप पदाधिकारी चंद्रशेखर अत्तरदे यांचा मनपा आयुक्तांशी वाद झाला होता. या वादानंतर मनपा आयुक्तांच्या दालनासमोर पोलीस बंदोबस्तदेखील वाढविण्यात आला होता. आता मनपा आयुक्तांनी अचानक १० दिवसांची रजा घेतल्याने शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून वाढत जाणाऱ्या नागरिकांच्या संतापामुळेच ही रजा घेतल्याची चर्चा मनपातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्हाधिकारी पाहणार कामकाज
मनपा आयुक्त दहा दिवस रजेवर गेल्यामुळे त्यांचा कारभार आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून शुक्रवारी मनपाला पत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात गाळेप्रश्न, शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या प्रश्नाला गती मिळण्याची शक्यता आहे.