पाल अभयारण्यात आढळले ६ कोटी वर्षांपूर्वीचे कॉलमनार बेसाल्ट खडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:33+5:302021-08-24T04:21:33+5:30
अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल अभयारण्य परिसरात ६ कोटी वर्षांपूर्वींच्या कॉलमनार बेसाल्ट ...

पाल अभयारण्यात आढळले ६ कोटी वर्षांपूर्वीचे कॉलमनार बेसाल्ट खडक
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल अभयारण्य परिसरात ६ कोटी वर्षांपूर्वींच्या कॉलमनार बेसाल्ट (दगडी खांब)च्या खडक आढळल्याचा दावा चंद्रपूर येथील भूगर्भशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी केला आहे. १४ ऑगस्ट रोजी या भागात पाहणी करत असताना हे खडकाचे खांब आढळून आले आहेत. ६ कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून हे कॉलमनार बेसाल्ट नावाचे नैसर्गिक खडक तयार झाल्याचा दावा प्रा.चोपणे यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अतिप्राचीन आहे. ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाव्दारे तप्त लाव्हारस जळगाव जिल्हा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत वाहत आला. या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना डेक्कन ट्राप नावाने ओळखले जाते. ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात पश्चिमेकडे ६६०० फुट जाडीचा आहे. महाराष्ट्रात ८० टक्के हा भूभाग या बेसाल्ट खडकापासून बनला आहे. पुढे जवळजवळ ४ कोटी वर्षादरम्यान भूभागाच्या अंतर्गत टक्करमुळे जमीन उंच होत गेली व त्यातूनच सातपुडा पर्वतरांग निर्माण झाल्याचे प्रा.चोपणे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
या भागातही आढळले आहे कॉलमनार बेसाल्ट
पाल अभयारण्याशिवाय याआधी कॉलमनार बेसाल्ट हे कर्नाटकातील सेंट मेरी बेटवर आढळून आले आहेत. यासह राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यांमध्येदेखील कॉलमनार बेसाल्टची नोंद आहे. त्यात आता जळगाव जिल्ह्यातील पाल येथील खडकाचीदेखील भर पडली आहे.
कशी झाली असेल निर्मिती?
पश्चिम महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी जास्त असून विदर्भात या खडकाची जाडी कमी आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून झीज होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून अनेक नव्या जीवाश्मांचे संशोधन होऊ शकेल. जळगाव परिसरात काही कोटी वर्षांपूर्वी तप्त लाव्हारस वाहात आला. तेव्हा येथील नद्यात तो पडून थंड झाला. त्यामुळे त्याचे आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला व अशा प्रकारचे खांब तयार झाल्याचा दावा प्रा.चोपणे यांनी केला आहे. ऐतिहासिक काळात या खडकांचा वापर मंदिरांच्या बांधकामांसाठी व्हायचा.
या भागांमध्ये केले निरीक्षण
प्रा.सुरेश चोपणे यांनी १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान पाल व यावल अभयारण्यातील पाल, जामन्या, करजपानी, गटऱ्या, लंगडा आंबा, वाकी , टायगर कुटी, गारखेडा व शिर्वेल या परिसरात पाहणी केली. या भागांमध्ये भविष्यात झीज होवून काही ठिकाणी गडप झालेल्या प्राण्यांचे जिवाश्मे मिळण्याचीही शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
कोट...
यावल अभयारण्यात पाल याठिकाणाहून जावे लागते. याठिकाणी निसर्गाचे अदभुत सौंदर्य लाभले आहे. याठिकाणी आढळून येणाऱ्या कॉलमनार बेसाल्टसारख्या दुर्मीळ खडकांचे जतन करण्याची गरज आहे. राजकीय नेते, प्रशासनाने यावल अभयारण्यात जायला सुरक्षित रस्ते आणि सुविधा पुरवून पर्यटन विकासाला चालना देण्याची गरज आहे. मात्र, वन्यजीव व दुर्मीळ भौगोलिक पुराव्यांचे जतन करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले पाहिजेत.
-प्रा.सुरेश चोपणे, सदस्य केंद्रीय वन,पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय.