जळगाव : विटा वाहून नेणाऱ्या टेम्पोच्या धडकेत फैसल मुस्ताक पटेल (वय २१, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) हा महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला तर वसिक खान युसुफ खान हा जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी १०.१५ वाजता ममुराबाद रस्त्यावर हा अपघात झाला. फैसल पटेल कुटूंबातील एकुलता मुलगा होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल हा ममुराबाद गावानजीकच्या अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो मित्र वसिक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला जात होता असताना ममुराबादगावाकडून जळगाव शहराकडे विटा घेऊन येत असलेल्या टेम्पोची (एम.एच १३ ए.एन.४४४५) दुचाकीला जोरदार धडक बसली. त्यात फैसलच्या डोक्याला मार लागून कवटी फुटली, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर मागे बसलेले वसिक लांब फेकला गेला. त्याच्याही हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. फैसल याला मृत घोषीत करण्यात आले तर वसिक याच्यावर प्राथमिक उपचार करुन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
फैसलला काकांनी घेतले होते दत्तक
फैसल याला जाहीद मुनाफ पटेल यांनी लहानपणापासूनच दत्तक घेतले होते. जाहीद पटेल पहूर येथे उर्दू शाळेत मुख्याध्यापक आहेत तर त्याचे वडिल मजुरी करतात. दोघं भावांचा फैसल हा एकुलता मुलगा होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर कुटूंबिय, नातेवाईक, मित्र व महाविद्यालयातील,शिक्षक व विद्यार्थ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. फैसल पाहून जो तो हंबरडा फोडत होता. फैसल हा महाविद्यालयात टॉपर होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.