अतिक्रमित बांधकाम थांबवून चौकशीचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:47+5:302021-09-12T04:20:47+5:30
पाचोरा नगरपालिकेच्या हद्दीत शेतकरी सहकारी संघाजवळील जागेवर बांधकाम सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या लगत असलेल्या ब्रिटिशकालीन नाल्याच्या नैसर्गिक आकारात बदल ...

अतिक्रमित बांधकाम थांबवून चौकशीचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश
पाचोरा नगरपालिकेच्या हद्दीत शेतकरी सहकारी संघाजवळील जागेवर बांधकाम सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या लगत असलेल्या ब्रिटिशकालीन नाल्याच्या नैसर्गिक आकारात बदल करण्यात आला. नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता चार फूट व्यासाचा ह्यूम पाइप टाकून नाला बंदिस्त करून उर्वरित जागेवर अतिक्रमण करून शासनाच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेले अतिक्रमित बांधकाम थांबावे, म्हणून नगरसेवक भूषण वाघ यांनी २३ जून रोजी रास्ता रोकोदेखील केले होते. हे बांधकाम त्वरित थांबवून चौकशी करण्याबाबतचा तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगरसेवक भूषण वाघ यांनी २७ जुलै रोजी दिला होता
या अर्जाची दखल घेत याप्रकरणी नियमानुसार सविस्तर तत्काळ कार्यवाही करण्यात येऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले असून मुख्याधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत निर्देशित करण्यात येईल, अशा आशयाचे सहायक आयुक्त सतीश दिघे यांच्या स्वाक्षरीचे उत्तर नगरसेवक भूषण वाघ यांच्या तक्रार अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.